टोमॅटो, वाटाण्याने गाठली ऐंशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 06:32 PM2017-07-23T18:32:57+5:302017-07-23T18:32:57+5:30
पुराच्या पाण्याने भाजीपाल्याची आवक मंदावली : श्रावणाच्या पार्श्वभूमीवर दर वधारणार
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि.२३ : उत्पादन कमी त्यात पुराच्या पाण्याने आवक मंदावल्याने टोमॅटो व हिरवा वाटाणा चांगलाच कडाडला असून दर ऐंशी रुपयांपर्यंत पोहचला आहे. श्रावणाच्या पार्श्वभूमीवर भाज्यांच्या मागणीत वाढ होणार असल्याने दर आणखी वधारण्याची शक्यता आहे. कडधान्यासह शाबू , शेंगदाणे, साखरेचा दर स्थिर आहे. सरकी तेलाच्या दरात थोडी वाढ झाली आहे. राज्यात सर्वत्र गेले आठ-दहा दिवस जोरदार पाऊस झाल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या आवकेवर झाला आहे. जून मधील आवकेच्या तुलनेत भाजीपाला निम्यावर आला आहे.
गेले वर्षभर दहा ते वीस रुपये किलोपर्यंत राहिलेला टोमॅटोचा दर ऐंशी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. उन्हाळ्यात टोमॅटो मातीमोल किमतीने विकावा लागल्याने यंदा एप्रिल-मेमध्ये टोमॅटोची नवीन लागण झालीच नाही. त्यामुळे आवक मंदावल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या सांगली, सोलापूर येथून नियमित आवकेपेक्षा २५ टक्केच आवक सुरू असल्याने दर वधारला आहे. घाऊक बाजारात ६० रुपयांपर्यंत दर असल्याने किरकोळमध्ये ऐंशी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
ओला वाटाण्यांचा दरही गगनाला भिडला आहे. हुबळी, धारवाड येथून आवक सुरू झाली असली तरी मागणी जास्त असल्याने दर तेजीत आहे. ओली मिरचीही तेजीत असून गवारी, दोडका, कारली ६० रुपये किलो आहे. वांगी, वरणा, ढब्बू ४० रुपयांपर्यंत किलो दर आहे. कोथंबीरची आवक वाढल्याने दर कमी झाले आहेत, किरकोळ बाजारात कोथंबीर दहा, मेथी पंधरा रुपयाला दोन असा दर आहे.
जीएसटीमुळे कडधान्य मार्केट अद्याप सुस्तच दिसत आहे. या कराबाबत अद्याप व्यापाऱ्यांच्या पातळीवर गोंधळ सुरू असल्याने त्याचा परिणाम विक्रीवर होऊ लागला आहे. किरकोळ बाजारात साखर ४२ रुपयांवर स्थिर असली तरी सरकी तेलाच्या दरात प्रतिकिलो पाच रुपयांची वाढ झाली आहे. श्रावणामुळे शाबू, शेंगदाणांची मागणी वाढू लागली आहे, पण दरात फारशी चढ-उतार दिसत नाही. कांदा-बटाट्याची आवक स्थिर असल्याने दरही कायम राहिले आहेत. घाऊक बाजारात कांद्याचा दर सरासरी ७ तर बटाटा ८ रुपये आहे.
फळमार्केट अद्याप गारठलेच!
पावसामुळे गेले दीड महिना फळ मार्केटमधील उलाढाल एकदम थंड झाली आहे. या आठवड्यात तर पुराच्या पाण्यामुळे मार्केट एकदमच गारठले आहे. श्रावणाच्या पार्श्वभूमीवर आजपासून थोडी तेजी येईल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. कोकण मार्ग बंदचा परिणाम कोल्हापूर बाजार समितीतून रोज २० ते २५ ट्रक भाजीपाला, कांदा-बटाटा कोकणात जातो; पण कोकणात जाणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी पाणी असल्याने वाहतूक तीन दिवस बंद असल्याने भाजीपाल्याची वाहतूक ठप्प झाली आहे.