टोमॅटो दहा रुपये किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 12:41 AM2018-01-08T00:41:01+5:302018-01-08T00:43:29+5:30
कोल्हापूर : टोमॅटोंची आवक वाढल्याने घाऊक बाजारात तीन रुपये किलोपर्यंत दर खाली आला आहे. किरकोळ बाजारात तर लालभडक टोमॅटो दहा रुपये किलो झाला आहे. मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तीळ, बाजरीची मागणी वाढली असून, तीळगूळ व तिळाच्या गोळ्यांची आवकही चांगली आहे. फळांची आवक वाढत असून बोरे व द्राक्षांची रेलचेल चांगली आहे.
कोल्हापूर बाजार समितीमध्ये टोमॅटोंची आवक जोरात सुरू आहे. रोज तीन हजार कॅरेट येत असल्याने दर घसरू लागले आहेत. घाऊक बाजारात तीन ते सात रुपयांपर्यंत दर असून सरासरी प्रतिकिलो पाच रुपये दर आहे. गेल्या आठवड्यापेक्षा सरासरी दरात पाच रुपये कमी झाले आहेत. ढबू मिरची, दोडक्याच्या दरांतही घसरण झाली असून कोबी, वांगी, गवार व ओल्या वाटाण्याच्या दरांत थोडी वाढ झाली आहे. कोथिंबिरीची आवकही वाढली असून, रोज पंचवीस हजार पेंढ्या येत आहेत. घाऊक बाजारात अडीच रुपये पेंढी झाली आहे. हरभºयाच्या पेंढ्यांची आवक कमी झाल्याने दर थोडासा तेजीत आहे. मेथी, पालक, पोकळा, शेपूचे दर थोडे वाढले आहेत.
मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर तीळगूळ, राळ, गूळ, बाजरीची आवक व मागणी वाढली आहे. किरकोळ बाजारात बाजरी २४ रुपये, तर राळ ४० रुपये किलो दर आहे. गुळाची मागणी वाढली असली तरी दर ४० रुपयांपर्यंत खाली आला आहे. तूर व हरभरा डाळींचे दर स्थिर आहेत. फळ मार्केटमध्ये माल्टा, चिकू, सफरचंद, डाळिंबांची आवक चांगली असून बोरांची आवक मात्र वाढली आहे. बाजार समितीत रोज बोरांच्या एक हजार पोत्यांची आवक सुरू आहे. द्राक्षांची आवक हळूहळू वाढू लागली असून, घाऊक बाजारात सरासरी ३० रुपये किलोपर्यंत दर आहे. ग्राहकांना अद्याप ‘सोनका’ द्राक्षांची प्रतीक्षा असल्याने मागणी फारशी दिसत नाही.
साखरेचा दर वधारला!
गेल्या महिनाभर साखरेचे दर हळूहळू घसरू लागले होते; पण गेल्या दोन दिवसांत घाऊक बाजारात साखरेच्या दरात थोडी वाढ होत असून, प्रतिक्विंटल ३३५० रुपये दर राहिला आहे.
लसूण २५ रुपये किलो
लसणाचे दरही घसरू लागले असून किरकोळ बाजारात २५ रुपये किलो दर झाला आहे. गत आठवड्यापेक्षा कांद्याच्या आवकेत ३८९३ क्विंटलनी घट झाल्याने दरात थोडी वाढ झाली आहे. बटाट्याची आवक व दर मात्र स्थिर आहेत.