‘लोकमत’चा उद्या वर्धापनदिन सोहळा

By admin | Published: August 19, 2015 01:08 AM2015-08-19T01:08:32+5:302015-08-19T01:08:51+5:30

मान्यवरांची उपस्थिती : धैर्यप्रसाद हॉलमध्ये होणार स्नेहमेळावा

Tomorrow anniversary celebration of 'Lokmat' tomorrow | ‘लोकमत’चा उद्या वर्धापनदिन सोहळा

‘लोकमत’चा उद्या वर्धापनदिन सोहळा

Next

कोल्हापूर : कोल्हापूरच्या समाजजीवनाचे महत्त्वाचे अंग बनलेल्या आणि ‘पत्रकारिता परमो धर्म’चे व्रत घेतलेल्या ‘लोकमत’चा उद्या, गुरुवारी अकरावा वर्धापनदिन सोहळा साजरा होत आहे. त्यानिमित्त येथील ताराबाई पार्कातील धैर्यप्रसाद हॉलमध्ये सायंकाळी पाच ते रात्री नऊपर्यंत वाचक, हितचिंतक, जाहिरातदार व विक्रेत्यांचा स्नेहमेळावा होणार आहे.
या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन महापौर वैशाली डकरे व जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विमल पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक प्रमुख उपस्थित असणार आहेत. वर्धापनदिनानिमित्त ‘ग्लोबल कोल्हापूरकर’ हा विशेषांक प्रसिद्ध होईल. वाचकांच्या भेटीला हा विशेषांक आज, बुधवारपासून येणार आहे. महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या ‘लोकमत’ने वाचकांच्या विश्वासाच्या बळावर कोल्हापूरमध्ये मानाचे स्थान पटकाविले आहे. थेट पाईपलाईन, हद्दवाढ, उद्योग-व्यापार, अंबाबाई मंदिर, चित्रनगरी, वाहतुकीची समस्या, आदी प्रश्नांवर ‘आता बस्स्’च्या माध्यमातून त्याने लोकप्रतिनिधी व शासनाला हादरवून सोडले. त्यामुळे वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या. यातील बहुतांश प्रश्नांवर कार्यवाही सुरू झाली. काहींची सोडवणूक झाली. बातम्यांसह ‘सखी मंच’, ‘युवा मंच’ आणि ‘बाल मंच’च्या माध्यमातून ‘लोकमत’ सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमदेखील राबविते. कोल्हापूरच्या मातीशी नाळ जोडलेल्या ‘लोकमत’चा रोजचा अंक व विविध पुरवण्यांमधून वाचकांना सकस, उत्तम ज्ञान आणि माहिती देण्याचा प्रयत्न राहिला आहे. जे चुकीचे आहे त्यावर प्रहार करतानाच जे चांगले आहे त्याला आवर्जून बळ देण्याची भूमिकाही ‘लोकमत’ने सक्षमपणे बजावली आहे. पत्रकारितेची मूल्ये जपतानाच समाजातील बंधुभाव वाढीस लागावा, असा प्रयत्न राहिला आहे. त्यामुळे वाचकांकडून ‘लोकमत’ला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्याची शिदोरी घेऊनच ‘लोकमत’ हा वर्धापनदिन सोहळा साजरा करीत आहे. (प्रतिनिधी)

छायाचित्र प्रदर्शनाचे आज उद्घाटन ज्येष्ठ छायाचित्रकारांचा सन्मान
कोल्हापूर : ‘लोकमत’च्या कोल्हापूर आवृत्तीचा ११ वा वर्धापनदिन व जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आज, बुधवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. शाहू स्मारक भवनच्या कला दालनात सकाळी अकरा वाजता होणाऱ्या या उद्घाटन समारंभास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव, ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून दिलेल्या योगदानाबद्दल ज्येष्ठ छायाचित्रकार मालोजी केरकर, शेखर वाली व बापू मकानदार यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास मुख्य प्रायोजक म्हणून आर. एल. ज्वेलर्स, सहप्रायोजक म्हणून सुभाष फोटो स्टुडिओ यांचे सहकार्य लाभले आहे. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त आयोजित छायाचित्र स्पर्धेत ‘ग्लोबल-लोकल टुरिझम’ आणि ‘वाईल्डलाईफ फोटोग्राफी’ असे दोन विषय दिले होते. निवडक छायाचित्रे या प्रदर्शनात लावण्यात आली आहेत. या छायाचित्रांच्या विक्रीतून मिळणारी रक्कम चेतना अपंगमती विकास संस्थेला देण्यात येणार आहे; तरी अधिकाधिक नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेत सामाजिक कार्यास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘ग्लोबल कोल्हापूरकर’ भेटीला
यावर्षीच्या वर्धापनदिनानिमित्त ‘ग्लोबल कोल्हापूरकर’ हा विशेषांक प्रसिद्ध करण्यात येत आहे. कोल्हापूरकरांनी जगाच्या कानाकोपऱ्यांत आपल्या कार्यकर्तृत्वाने वेगळा ठसा उमटविला आहे. विविध क्षेत्रांत त्यांनी तेथे आपले पाय घट्ट रोवले आहेत. कोल्हापूरची माणसे जगभरात आहेत. त्यांची या विशेषांकाच्या माध्यमातून ओळख करून देण्यासह भेट घडवून देण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला आहे.स्नेहमेळावा वेळ : गुरुवारी,सायंकाळी
पाच ते रात्री नऊ स्थळ : धैर्यप्रसाद हॉल, ताराबाई
पार्क, कोल्हापूर

Web Title: Tomorrow anniversary celebration of 'Lokmat' tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.