‘लोकमत’ सांगली आवृत्तीचा उद्या वर्धापनदिन
By admin | Published: March 24, 2017 12:20 AM2017-03-24T00:20:53+5:302017-03-24T00:20:53+5:30
स्नेहमेळाव्याचे आयोजन : जिल्ह्यात दीड तपाची यशस्वी वाटचाल
सांगली : वाचकांशी असलेले विश्वासार्हतेचे घट्ट नाते जपत दीड तपाची यशस्वी वाटचाल करणाऱ्या ‘लोकमत’च्या सांगली आवृत्तीचा अठरावा वर्धापन दिन शनिवार, दि. २५ मार्चरोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने सांगलीत स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
वाचक, वृत्तपत्र विक्रेते, जाहिरातदार, हितचिंतक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रेमरूपी शुभेच्छांमुळे गेल्या अठरा वर्षांत ‘लोकमत’ने सांगली जिल्ह्यात सुदृढ वाचक चळवळ निर्माण केली. विश्वासार्हतेची ही परंपरा यापुढेही अखंडित ठेवण्याचे व्रत घेऊन ‘लोकमत’ परिवाराची वाटचाल सुरू आहे.
विविध क्षेत्रांशी, वाचकांशी असलेले हे नातेसंबंध अधिक दृढ करण्याच्यादृष्टीने वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सांगलीतील माधवनगर रस्त्यावरील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या सभागृहात शनिवारी सायंकाळी पाच ते आठ या वेळेत स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर, वाचक, हितचिंतक, नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून स्नेह वृद्धिंगत करावा.
पर्यावरण रक्षण व स्वच्छतेचा मंत्र जपताना पुष्पगुच्छ, पुष्पहाररूपी शुभेच्छांना फाटा देण्याचा निर्णय ‘लोकमत’ने घेतला आहे. त्यामुळे मेळाव्यास येणाऱ्यांनी पुष्पगुच्छ, पुष्पहार घेऊन येऊ नये, असे आवाहन ‘लोकमत’ परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)