उद्यापासून अवधूत घारगे स्मृतिचषक फुटबॉल स्पर्धा
By admin | Published: February 4, 2015 12:40 AM2015-02-04T00:40:33+5:302015-02-04T00:40:47+5:30
दि. १५ फेब्रुवारीपर्यंत हे सामने होणार असून उद्या, गुरुवारी चार वाजता प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ ‘ब’ यांच्यादरम्यान सामने होणार आहेत.
कोल्हापूर : राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू अवधूत राजेंद्र घारगे स्मृतिचषक सीनिअर फुटबॉल स्पर्धा उद्या, गुरुवारपासून छत्रपती शाहू स्टेडियमवर होणार आहेत. स्पर्धेमधील प्रथम क्रमांकास रोख रु. ५१ हजार रुपये व स्मृतिचषक देण्यात येणार आहे, अशी माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष श्रीनिवास जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. जाधव म्हणाले, राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू अवधूत घारगे यांच्या स्मरणार्थ या स्पर्धा घेण्यात येतात. स्पर्धांचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. स्पर्धेतील उपविजेत्या संघास रोख ३१ हजार व स्मृतिचषक देण्यात येणार आहे. उपांत्य फेरीमध्ये बाद ठरणाऱ्या दोन संघांना रोख रक्कम ७ हजार ५०० देण्यात येणार आहेत. प्रत्येक सामन्यातील बाद संघातील उत्कृष्ट खेळाडूस स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. यासह अंतिम सामन्यातील उत्कृष्ट गोलकीपर, डिफेंडर, हाफ, फॉरवर्ड खेळाडूंना रोख १५०० रुपये व आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. नौशाद बोबडे म्हणाले, स्पर्धेदरम्यान १५ वर्षांखालील महाराष्ट्र हायस्कूल, प्रायव्हेट, शाहू, सेंट झेव्हिअर्स स्कूलमधील शालेय फुटबॉल संघाचे प्रदर्शनीय सामने होणार आहेत. या स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना बक्षीस देण्यात येणार आहे. दि. १५ फेब्रुवारीपर्यंत हे सामने होणार असून उद्या, गुरुवारी चार वाजता प्रॅक्टिस फुटबॉल क्लब ‘अ’ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ ‘ब’ यांच्यादरम्यान सामने होणार आहेत. याप्रसंगी राजेंद्र घारगे, उमेश सावंत, श्रीकांत मोहिते, नेताजी डोंगळे, सुनील ठोमरे, आदी उपस्थित होते.
मालोजीराजे उद्घाटक
या फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन मालोजीराजे छत्रपती यांच्याहस्ते आणि करवीरचे पोलीस उपअधीक्षक अमर जाधव, जाधव इंडस्ट्रीजचे डायरेक्टर चंद्रकांत जाधव, नौशाद बोबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.