तोतापुरी, लालबाग आंब्याची आवक,डाळी कडाडल्या : मेथी, कोथिंबीर २० रुपये पेंढी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 02:24 PM2019-05-06T14:24:02+5:302019-05-06T14:28:54+5:30
तोतापुरी आंब्यांची आवक सुरू झाली असून, किरकोळ बाजारात नगाचा दर १५ ते २० रुपये राहिला आहे. हापूसबरोबरच लालबाग आंब्याची आवक चांगली आहे. डाळींसह कडधान्यांच्या दरांत वाढ झाली असून, पाणीटंचाईमुळे भाजीपाल्याचे दर काहीसे वधारले आहेत. मेथी व कोथिंबीर २० रुपये पेंढी दर राहिला आहे.
कोल्हापूर : तोतापुरी आंब्यांची आवक सुरू झाली असून, किरकोळ बाजारात नगाचा दर १५ ते २० रुपये राहिला आहे. हापूसबरोबरच लालबाग आंब्याची आवक चांगली आहे. डाळींसह कडधान्यांच्या दरांत वाढ झाली असून, पाणीटंचाईमुळे भाजीपाल्याचे दर काहीसे वधारले आहेत. मेथी व कोथिंबीर २० रुपये पेंढी दर राहिला आहे.
सध्या बाजारात हापूस आंब्यांची रेलचेल सुरू आहे. त्यात कोकणातील हापूसची आवक काहीशी मंदावली असून, मद्रास हापूस मात्र जोेरात आहे. दोन्ही आंबे दिसायला सारखेच असले तरी चवीत थोडा फरक जाणवतो. कोकण हापूसची पेटी सरासरी १२५० रुपये, तर २२५ रुपये बॉक्सचा दर आहे. त्या तुलनेत मद्रास हापूसची पेटी ९०० रुपये, तर २०० रुपये बॉक्सचा दर राहिला आहे. त्याशिवाय मद्रास पायरीचीही आवक सुरू झाली असून, त्याचा दर हापूसच्या तुलनेत पेटीमागे २०० रुपयांनी कमी आहे.
हापूसचा दर अद्यापही थोडा तेजीत असला तरी सामान्य ग्राहकांना लालबाग आंब्याने दिलासा दिला आहे. (छाया- आदित्य वेल्हाळ)
यंदा हापूस बाजारात असतानाच तोतापुरी आंब्याची आवक सुरू झाली आहे. तोतापुरीची आवक कमी असली तरी दर मात्र आवाक्यात आहे. किरकोळ बाजारात १५ ते २० रुपये नगाचा दर आहे. लालबागचा आंबाही आवाक्यात असून ६० रुपये किलोपर्यंत दर राहिला आहे.
कडक उन्हाळ्यामुळे भाजीपाल्याच्या आवकेवर परिणाम झाला आहे. विशेष करून पालेभाज्यांची आवक मंदावल्याने दर चांगलेच भडकले आहेत. किरकोळ बाजारात मेथी २० रुपये, तर कोथिंबिरीचे दरही त्याच्या जवळपासच आहेत. वांग्यांच्या दरात थोडी वाढ झाली असून, टोमॅटोही २० रुपये किलोपर्यंत आहे. ढबू, कारली, दोडक्याच्या दरांत थोडी वाढ झाली आहे. ओला वाटाणा पुन्हा बाजारात दिसत असून दर मात्र ८० रुपये किलो आहे.
वर्षभर स्थिर असणाऱ्या कडधान्यांच्या दरांत वाढ होऊ लागली आहे. तूरडाळ ९० रुपये, हरभराडाळ ७०, मूगडाळ १००, मटकी १२० रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. ऐन चटणीच्या हंगामात मिरचीसह खोबरे व मसाल्याच्या दरांत मोठी वाढ झाली आहे. ब्याडगी १६०, गुंटूर १४० रुपये किलो आहे. शाबूने तर शंभरी गाठली असून, साखर व सरकी तेल मात्र स्थिर आहे.
मक्याला दोन वर्षांतील उच्चांकी दर
मक्याचे उत्पादन घटल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात गेल्या वर्षी १० ते १२ रुपये किलोचा दर होता. या वर्षी १८ ते २० रुपयांपर्यंत वाढ झाली असून, आगामी महिन्याभरात २२ रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाज आहे.
कांदा-बटाटा स्थिर
कांद्याची आवक थोडी वाढली आहे. घाऊक बाजारात कांदा ११ रुपये, तर बटाटा १६ रुपये किलोपर्यंत आहे. लसणाने मात्र थोडी उसळी घेतली आहे.