महत्त्वाच्या ५ संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:16 AM2021-06-10T04:16:37+5:302021-06-10T04:16:37+5:30
कोल्हापूर : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने १७ व १८ जून रोजी ऑनलाइन जॉब फेअरचे ...
कोल्हापूर : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने १७ व १८ जून रोजी ऑनलाइन जॉब फेअरचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये ट्रेनी वर्कर, सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेल्स ऑफिसर, मॅनेजर, एचआर मॅनेजर, मशीन शॉप, लेथ ऑपरेटर, विमा सल्लागार, टेलिकॉलर, एसएफओ, बीओएम, आयटीआय सीएनसी, डिप्लोमा, मेकॅनिकल इंजिनिअर, अशा ८ वी ते पदवीधर, पदव्युत्तर, आयटीआय, डिप्लोमा, बी. ई. मेकॅनिकल अशा शैक्षणिक पात्रतेची जिल्ह्यातील नामांकित ९ कंपन्यांच्या २२७ पदांसाठी निवड करण्यात येणार आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
---
गवत विक्रीसाठी दरपत्रकाचे आवाहन
कोल्हापूर : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अखत्यारितील महासैनिक दरबाल हॉल परिसरातील पडसर जमिनीतील गवताची विक्री करण्यात येणार आहे. तरी इच्छुक खरेदीदारांनी प्रत्यक्ष पाहणी करून आपली दरपत्रके सीलबंद लिफाफ्यात घालून २१ जून रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावीत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रदीप ढोले यांनी केले आहे.
--
बालकामगारांची माहिती द्या
कोल्हापूर : बाल व किशोरवयीन कामगार प्रतिबंध कायद्यानुसार १४ वर्षांखालील बालकांना कामावर ठेवणे, तसेच १४ ते १८ या वयोगटातील मुलांना धोकादायक उद्योग व प्रक्रियांमध्ये कामावर ठेवणे हा गुन्हा आहे. तरी नागरिकांना किंवा व्यावसायिकांना एखाद्या उद्योगात किंवा दुकानात असे बालकामगार आढळल्यास त्यांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, शाहूपुरी, व्यापारी पेठ, कोल्हापूर यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त संदेश आयरे यांनी केले आहे.
---
आरटीईअंतर्गत प्रवेशप्रक्रिया सुरू
कोल्हापूर : आरटीईअंतर्गत सन २०२१-२२ साठी २५ टक्के विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया ११ ते ३० जून या कालावधीत होणार असून, पालकांनी पाल्याचा प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी केले आहे.
आरटीई अंतर्गत ७ एप्रिल रोजी सोडत काढण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना लॉटरी लागलेली आहे, अशा विद्यार्थ्यांची निवड यादी व पुढील फेरीसाठी प्रतीक्षा यादी आरटीई पोर्टलवरील होमपेजवर अपलोड करण्यात आली आहे. याकाळात पालकांनी शाळांमध्ये प्रवेश निश्चित न केल्यास त्यांना पुढील फेऱ्यांमध्ये पुन्हा संधी दिली जाणार नाही.