शिरोळ संक्षिप्त बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:20 AM2020-12-26T04:20:09+5:302020-12-26T04:20:09+5:30
शिरोळ : सध्या शिरोळ तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. काही गावात इच्छुकांकडून जोरदार तयारी सुरू आहे, तर काही ...
शिरोळ : सध्या शिरोळ तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. काही गावात इच्छुकांकडून जोरदार तयारी सुरू आहे, तर काही ठिकाणी आरक्षण पडलेल्या जागेचा उमेदवार शोधावा लागत आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव आणि उमेदवारी असाच घोळ सुरू आहे. त्यामुळे पॅनेलप्रमुखांची डोकेदुखी वाढली आहे.
सरपंच पदाचे आरक्षण जाहीर नसल्याने नाराजी
शिरोळ : सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर होणार आहे. त्यामुळे अनेकांच्या इच्छुकांवर विरजण पडले आहे. निवडणुकीपूर्वी आरक्षण जाहीर न झाल्यामुळे निवडणुकीत निरुत्साह असला तरी नशीब आजमावण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी कंबर कसली आहे.
निवडणुकीचे वातावरण तापले
शिरोळ : ग्रामपंचायत निवडणुकीच्यानिमित्ताने पॅनेलप्रमुखांकडून राजकीय व्यूहरचना आखली जात आहे. जुन्या जाणत्या मंडळींकडून युवा इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन केले जात आहे. मात्र काही गावात पॅनेलप्रमुख उमेदवारीचा अनेकांना शब्द देत असल्याने बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकूणच उमेदवारांची जुळवाजुळव व मतांच्या बेरजेची गणिते नेतेमंडळींकडून आखली जात आहेत.
निवडणुकीत कोरोनाचे नियम पाळा
जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींची निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने नियमांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे तितकेच गरजेचे आहे. मात्र, कोरोनाच्या नियमांचे पालन निवडणुकीत होताना दिसत नाही.
भाजी मंडईत सुविधा पुरवा
जयसिंगपूर : शहरातील महात्मा फुले भाजी मंडईत सुविधा पुरविण्याची मागणी होत आहे. भाजी मंडई चारही बाजूने बंदिस्त करण्यात यावी. मंडईत चोरीचे प्रकार घडत आहेत. शिवाय, महिलांसाठी स्वच्छतागृहांचीदेखील सोय करावी. मंडईतील पथदिवे देखील बंद असून, याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी इकबाल मणेर यांनी केली आहे.
-