टोपेसाहेब, कोल्हापुरातील कोरोना कमी का होत नाही?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:18 AM2021-07-16T04:18:34+5:302021-07-16T04:18:34+5:30
समीर देशपांडे / कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक ...
समीर देशपांडे / कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक धोकादायक असल्याचे सिद्ध झाले आहे. या वर्षीच्या केवळ साडेसहा महिन्यांत जिल्ह्यात एक लाख ३२ हजार ५५१ नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आले असून, केवळ दुसऱ्या लाटेत ३३९२ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रशासनाच्या सूचनेनुसार व्यापाऱ्यांनी दुकाने बंद केली. सर्वांनी घरात राहणे पसंत केले. जेव्हा परवानगी दिली तेव्हाच नागरिक बाहेर पडले. तरीही ना कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली; ना मृत्यू कमी झाले. मग आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच यामागची कारणे स्पष्ट केली तर तशी उपाययोजना करणे शक्य होणार आहे.
मे आणि जून या दोन महिन्यांत कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणावर झाला. मे महिन्यात ५० हजारांहून अधिक कोरोना रुग्णसंख्या नोंदविण्यात आली आहे. प्रशासनाकडूनही नियमांच्या अंमलबजावणीमध्ये चाललेला धरसोडपणा आणि नागरिकांची बेफिकिरी या सगळ्यांचा परिणाम म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना स्थिती अजूनही नियंत्रणामध्ये आलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. यापेक्षा आणखी काही कारणे आहेत का, याचाही ऊहापोह आरोग्यमंत्र्यांनी करण्याची गरज आहे.
चौकट
पहिल्या आणि दुसऱ्या लाटेची तुलनात्मक स्थिती
तपशील पहिली लाट दुसरी लाट
नमुना तपासणी ३०३५७९ १०१२८६१
पॉझिटिव्ह रुग्ण ४४,४३८ १.३२,५५१
दैनंदिन अधिकतम रुग्णसंख्या १७४७ २२०२
कोविड केअर सेंटर्स ६३ १९७
समर्पित कोविड रुग्णालये ४५ १०७
मृत्यू १७०९ ३३९२
दोन्ही लाटांतील पुरुष मृत्यू ३३७६
दोन्ही लाटांतील महिला मृत्यू १७०५
चौकट
दोन्ही लाटांतील बाधित रुग्णांची संक्षिप्त माहिती
कोरोनाबाधित रुग्ण १३.४४ टक्के
बरे झालेले रुग्ण ९१.१६ टक्के
सध्या क्रियाशील रुग्ण ७.२१ टक्के
मृत्यू २.९६ टक्के
चौकट
लसीकरण
लसीकरण उद्दिष्ट ३१ लाख ९४ हजार ९९४
पहिला डोस घेतलेले १० लाख १८ हजार ३०१
पहिला डोस टक्केवारी - ३२ टक्के
दुसरा डोस घेतलेले ४ लाख ३८ हजार ५४२
दुसरा डोस टक्केवारी १४ टक्के
चौकट
कोरोना स्थिती नियंत्रणात न येण्याची कारणे
१. मध्यंतरी झालेल्या काही निवडणुका
२. प्रशासनाने व्यवहारबंदी करण्यास लावलेला उशीर
३. स्थानिक पातळीवर न घेतलेली कडक भूमिका
४. नागरिकांची बेफिकिरी
चौकट
जनतेच्या मनातील प्रश्न
१ ‘गोकुळ’च्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढला का?
२ गतवर्षीप्रमाणे शहर आणि गावपातळीवर कडक नियोजन झाले नाही, हे कारण आहे का?
३ जर गृह अलगीकरण हे संसर्गवाढीचे कारण असेल तर असे रुग्ण संस्थात्मक अलगीकरणामध्ये ठेवण्यासाठी तेथील व्यवस्था सुधारल्या का?
४. जिल्हाधिकाऱ्यांनी ६ एप्रिल रोजी जिल्हा आणि तालुकाबंदीचा काढलेला निर्णय तातडीने फिरवण्यात आला; ते संसर्गवाढीचे कारण आहे का?
५. टास्क फोर्सचे सदस्य दोन महिन्यांपूर्वी येऊन गेले. त्यांनी ज्या सूचना केल्या, त्यांचे पालन झाले का? झाले नसेल तर याला जबाबदार कोण?
६. प्रशासनाने सांगितल्यानुसार दुकाने बंद, दुकाने सुरू, घरातून बाहेर पडू नका हे सगळे व्यापारी, हातावरचे पोट असणारे छाेटे व्यावसायिक, जनतेने निमूटपणे सहन केले. अशावेळी सर्व राजकीय निवडी, बैठका, मेळावे हे सर्व काही व्यवस्थित सुरू आहे; हे असे का?
७. जर चाचण्या वाढवल्या म्हणून पाॅझिटिव्ह रुग्णसंख्या वाढत असेल तर हे राज्यात सर्वत्र धोरण आहे का फक्त कोल्हापुरातच?