गारगोटीत महावितरण कार्यालयाला वीज बिलांचे तोरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:15 AM2021-07-23T04:15:20+5:302021-07-23T04:15:20+5:30
गारगोटी : लॉकडाऊन काळातही महावितरणकडून सक्तीने वीज बिल वसुली केली जात असल्याच्या निषेधार्थ ...
गारगोटी : लॉकडाऊन काळातही महावितरणकडून सक्तीने वीज बिल वसुली केली जात असल्याच्या निषेधार्थ गारगोटी येथील महावितरण कार्यालयाला गुरुवारी भुदरगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघाच्यावतीने भर पावसात लाईट बिल आणि निवेदनाचे तोरण बांधून अनोख्या प्रकारे आंदोलन केले. महावितरण कंपनी वीज बिल न भरल्या कारणाने सर्वसामान्य जनतेचा, व्यापारी वर्गाचा वीजपुरवठा खंडित करत आहे. हे करताना अनेक ठिकाणी सर्वसामान्य माणसावर दादागिरी आणि अन्यायाची भाषा केली जात आहे. तरी महावितरणकडून वीज बिलाच्या वसुलीसाठी चालू असणारी वीजतोडणी, दंड बिल आकारणी त्वरित थांबवावी. सर्वसामान्य जनतेला या महामारीतून आणि आर्थिक संकटातून सावरण्यासाठी वेळ द्यावा. भुदरगड तालुक्यातील काही ग्रामपंचायतीची वीज कनेक्शन थकीत बिलामुळे तोडलेली आहेत, ती पूर्ववत जोडण्याबरोबर या पुढे कोणत्याही ग्रामपंचायतीचे कनेक्शन तोडू नये. ही कारवाई तत्काळ न थांबवल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशारा गोकुळचे संचालक रणजित पाटील यांनी दिला.
या वेळी पदवीधरचे तालुकाध्यक्ष आनंदा देसाई, संतोष मेंगाणे, सरपंच सर्जेराव देसाई, शरद मोरे, जयवंत गोरे, शेखर देसाई, अजित देसाई, अमित देसाई, विजय अबिटकर, पं.स. सदस्य संग्राम देसाई, सागर मोरे, सयाजी देसाई, रवी वायदंडे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो : २२ गारगोटी आंदोलन
गारगोटी येथील महावितरणच्या कार्यालयाला विज बिलांचे तोरण बांधताना रणजित पाटील, अमित देसाई,आनंदा देसाई, शरद मोरे, विजय आबिटकर, संग्राम देसाई आदी.