चिपरी येथे कचरा टाकल्यास ‘दंगल’
By admin | Published: March 7, 2017 09:51 PM2017-03-07T21:51:39+5:302017-03-07T21:51:39+5:30
चिपरी ग्रामस्थ आक्रमक : जयसिंगपूर पालिकेला इशारा
जयसिंगपूर : जयसिंगपूर नगरपालिकेने पोलिस बंदोबस्तात चिपरी येथील खाणीत पुन्हा कचरा टाकण्याचा प्रयत्न केल्यास तो हाणून पाडला जाईल. गावच्या आरोग्यासाठी ग्रामस्थ आक्रमक होऊन त्यासाठी प्रसंगी व्यापक आंदोलन उभारतील, असा इशारा ग्रामस्थांनी पत्रकार बैठकीत दिला.
यावेळी माहिती देताना सेवानिवृत्त सहा. फौजदार राजाराम माने व आम आदमी पाटीर्चे विलास रजपूत म्हणाले, जयसिंगपूर शहारातील कचरा टाकण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चिपरी हद्दीतील दगड खाणीची जागा पालिकेला दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून याठिकाणी पालिकेचा कचरा टाकण्यात येत होता. दगड खाणीत पाण्याचे पाझर आहेत. यामुळे चिपरी परिसरातील कूपनलिका आणि विहीरींचे पाणी दूषित होत आहे. त्यामुळे प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आल्याने १ जानेवारीपासून याठिकाणी कचरा टाकण्यासाठी ग्रामस्थांनी विरोध केला होता. लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांच्यात बैठक घेऊन यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र, कचऱ्याचा प्रश्न न्यायालयात गेला आहे. जयसिंगपूर पालिकेच्या
२ मार्चला झालेल्या सभेत कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबत खुलासा करताना मुख्याधिकारी हेमंत निकम यांनी न्यायालयाची बाजू सांगून प्रसंगी पोलिस बंदोबस्तात चिपरी येथे कचरा टाकणार असल्याचे सांगितले होते. यावर चिपरी ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना उमटल्या आहेत. सोमवारी चिपरी ग्रामस्थांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. जयसिंगपूर पालिकेकडून घनकचऱ्याचे व्यवस्थापन होत नाही. कचऱ्याची विल्हेवाट लावताना उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन होते. आता पोलिस बंदोबस्तात पुन्हा कचरा टाकण्याचा प्रयत्न झाल्यास जनआंदोलन उभारू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला.
यावेळी महादेव माने, गजानन माळी, तंटामुक्त अध्यक्ष रमेश रजपूत, अनिल मगदूम, आप्पासाहेब कोरे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)