कुंडली बघायला आलेल्या तरुणीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 12:46 AM2018-12-04T00:46:33+5:302018-12-04T00:46:37+5:30
कोल्हापूर : कुंडली बघण्यास आलेल्या महाविद्यालयीन तरुणीला खडीसाखरेतून गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याप्रकरणी भोंदू ज्योतिषास राजारामपुरी पोलिसांनी सोमवारी अटक ...
कोल्हापूर : कुंडली बघण्यास आलेल्या महाविद्यालयीन तरुणीला खडीसाखरेतून गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याप्रकरणी भोंदू ज्योतिषास राजारामपुरी पोलिसांनी सोमवारी अटक केली. संशयित मनोज ऊर्फ बाबा मधुकर नरके (वय ५०, रा. छत्रपती कॉलनी, सागरमाळ-शास्त्रीनगर) असे त्याचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, शहरातील एका महाविद्यालयात कला शाखेच्या शेवटच्या वर्षात २0 वर्षांची तरुणी शिकते. ती स्पर्धा परीक्षेचा अभ्यासही करते. घरची परिस्थिती बेताची आहे. तिचे वडील दारू पिऊन आईसह तिला मारहाण करतात. रोजचा वडिलांकडून होणारा त्रास तिने आपल्या मैत्रिणीला सांगितला. तिने कौटुंबीक कलहाचा त्रास कमी होण्यासाठी तिला ओळखीच्या ज्योतिषी नरके याच्याकडे नेले. त्यांच्याकडून कुंडली काढून सल्ला घेण्यास सांगितले. १ डिसेंबरला मैत्रिण न आल्याने पीडित तरुणी एकटीच रिक्षाने भोंदू ज्योतिषी नरकेच्या घरी गेली. तिने कुंडली काढायची आहे. त्यासाठी किती खर्च येईल, अशी विचारणा केली. त्यावर नरकेने कुंडलीचे १५0 व सल्ला देण्याचे १५0 असे मिळून ३00 रुपये खर्च येईल, असे सांगितले.
त्यानंतर नरके हा पीडित तरुणीला घरी बसवून, आपल्या लहान मुलाला शाळेत सोडण्यास गेला. पुन्हा अर्ध्या तासाने तो घरी आला. त्यानंतर घरातील एका खोलीत पीडित तरुणीला नेले. दरवाजा बंद करून तिची समस्या जाणून घेतली. त्यानंतर तिला कुंडली काढून दिली. काही उपाय सांगितले. त्यानंतर पीडित तरुणीने मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहे. मला यश येईल का? अशी विचारणा केली. त्यावर नरकेने त्यासाठी तुला एक विधी करावा लागेल. अंगावरील वस्त्र काढावे लागतील. आजपर्यंत १६ ते ६० वर्षांतील अनेक तरुणी व महिलांवर मी असा विधी केल्याचे सांगितले.
नरकेच्या बोलण्याने तरुणीला धक्काच बसला. ती वस्त्र काढण्यास तयार नव्हती. तिची भांबावलेली अवस्था पाहून नरकेने तिला मला परमेश्वराचा आताच संदेश आला आहे. काही काळासाठी परमेश्वर सकारात्मक ऊर्जा देणार आहे. ती तुला देणार आहे, असे म्हणून खडी साखर खाण्यास दिली. त्यानंतर काही सेकंदात तरुणीला भुरळ आली. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला. शुद्धीवर आल्यानंतर तरुणीला मानसिक धक्काच बसला. तिने तेथून सुटका करून आपले घर गाठले. या प्रकाराची माहिती आई-वडिलांना दिली. त्यानंतर सोमवारी फिर्याद दिल्यानंतर भोंदू नरकेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील करीत आहेत.
बंद खोलीत भविष्य
मला परमेश्वराचा आशीर्वाद आहे. देव जी ऊर्जा देतो, ती इतरांच्या शरीरात मी सोडतो, असे सांगणारा भोंदू नरके बंद खोलीत भविष्य सांगत होता. त्याच्या खोलीत धूप, अगरबत्तीचा वास कोंडलेला असतो. भविष्य सांगणारी अनेक पुस्तके त्याच्याकडे आहेत. तो खोलीत गेल्यावर घरातील लोकांना येण्यास मज्जाव करतो.
भोंदू नरके विवाहित
नरके हा विवाहित असून, घरी पत्नी, मोठी मुलगी खासगी नोकरी करते, तर मुलगा कॉलेजला आहे. दुमजली घरात वरच्या मजल्यावर त्याच्या भावाचे कुटुंब राहते. कुंडली बघण्याच्या नावाखाली त्याने अनेक युवती, महिलांवर अत्याचार केला असून, बदनामीमुळे तक्रार देण्यास कोणी पुढे आले नसल्याची चर्चा परिसरात आहे.