नातीवर अत्याचार
By admin | Published: September 24, 2016 12:50 AM2016-09-24T00:50:07+5:302016-09-24T00:50:07+5:30
नराधमास अटक
कोल्हापूर : कनाननगर येथे घरात कोणी नसल्याचे पाहून ११ वर्षांच्या नातीवर अत्याचार केल्याच्या संशयातून रांगोळी (ता. हातकणंगले) येथील ६५ वर्षांच्या नराधम आजोबास शाहूपुरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.
अधिक माहिती अशी, पीडित मुलगी आई-वडील व लहान भाऊ यांच्यासमवेत कनाननगर येथे राहते. वडील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात गजरे, फुले, तर आई भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करते. दरम्यान, रांगोळी येथे राहणारा आजोबा गणेशोत्सव काळात कनाननगर येथे राहण्यास आला होता. १९ सप्टेंबरला आई-वडील व्यवसायानिमित्त बाहेर गेले होते. मुलगी व आजोबा असे दोघेच घरी होते. यावेळी दुपारी ती झोपलेली पाहून तिच्यावर आजोबाने अत्याचार केला. त्यानंतर घरी कोणाला सांगितलेस तर ठार मारण्याची धमकी मुलीला दिली. त्यामुळे भीतीने मुलीने घडलेला प्रकार सांगितला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही तिच्यावर अत्याचार केला. रात्री आई-वडील घरी आल्यानंतर मुलगी रडत असल्याचे दिसून आले. त्यांनी तिच्याकडे विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. हे ऐकून त्यांना धक्काच बसला. त्यांनी या प्रकाराची माहिती जवळच्या नातेवाइकांना सांगितली. आपले पितळ उघड झाल्याने संशयित आजोबाने तेथून पलायन केले. मुलीच्या जीविताला धोका असल्याने अखेर मुलीच्या आईने सासऱ्याच्या विरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी संशयित नराधम आजोबाला रांगोळी येथील घरातून अटक केली. आज, शनिवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विलास भोसले करीत आहेत.
पश्चात्तापाचा लवलेश नाही
पीडित मुलीची घरची परिस्थिती बेताची आहे. आई-वडील साधे असून, व्यवसायातून मिळणाऱ्या तुटपुंजा पैशातून ते उदरनिर्वाह चालवितात. संशयित आजोबाकडे पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले चौकशी करीत होते, त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेशही दिसत नव्हता. बाहेर मात्र पीडित मुलीचे आई-वडील अश्रू ढाळत होते.