कळंबा कारागृहाची झाडाझडती, दोन मोबाईल, चार बॅटरी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 12:56 PM2020-02-06T12:56:55+5:302020-02-06T12:58:05+5:30
कळंबा मध्यवर्ती कारागृहात मोबाईल, सिमकार्ड व बॅटरी पुन्हा एकदा सापडल्या. कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांनी पदभार स्वीकारल्यानंतर झाडाझडती घेऊन दोन मोबाईल, चार बॅटरी शोधून काढल्या. कैद्यांकडे चौकशी करून याबाबत गुन्हा दाखल करणार असल्याचे शेळके यांनी सांगितले.
कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात मोबाईल, सिमकार्ड व बॅटरी पुन्हा एकदा सापडल्या. कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके यांनी पदभार स्वीकारल्यानंतर झाडाझडती घेऊन दोन मोबाईल, चार बॅटरी शोधून काढल्या. कैद्यांकडे चौकशी करून याबाबत गुन्हा दाखल करणार असल्याचे शेळके यांनी सांगितले.
कळंबा कारागृहाचे अधीक्षक शरद शेळके हे नोव्हेंबर २०१९ मध्ये पुणे येरवडा कारागृहात प्रशिक्षणासाठी गेले होते. दरम्यान, महादेव गावडे यांच्याकडे कारागृहाचा पदभार दिला होता. शेळके यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बुधवारी (दि. ५) पुन्हा कळंबा कारागृहाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर दुपारी त्यांनी कारागृहाची झाडाझडती घेतली. तेव्हा एका ठिकाणी जमिनीमध्ये पुरून दोन मोबाईलसह चार बॅटरीही आढळून आल्या. त्या त्यांनी जप्त केल्या.
कळंबा कारागृहात मोबाईल व सिमकार्ड सापडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. बुधवारी पुन्हा असा प्रकार उघडकीस आल्यानंतर कारागृहाच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कारागृहातून न्यायालयात जाणारे कैदी, रुग्णालयात उपचारासाठी बाहेर गेलेले कैदी चोरून असे मोबाईल आत आणत असल्याचे बोलले जात आहे. जप्त केलेले मोबाईल कोणाचे आहेत, ते कोणी लपविले याची कसून चौकशी केली जाणार आहे. त्यानंतर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल केला जाईल, असेही शेळके यांनी स्पष्ट केले आहे.
काटेकोरपणे झाडाझडती आवश्यक
कारागृहातून बाहेर जाणाऱ्या व कारागृहात परत येणाऱ्या प्रत्येक कैद्याची काटेकोरपणे झडती घेण्यासाठी कारागृहाचे कर्मचारी नेमलेले असतात. तरीसुद्धा असे प्रकार घडत आहेत; त्यामुळे कर्मचारी दुर्लक्ष करीत असल्याने या वस्तू कारागृहात येत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अशा कैद्यांची काटेकोरपणे व प्रामाणिकपणे झडती घेणे आवश्यक बनले आहे. एकूणच, या घटनांमुळे कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे.