करवीरमध्ये उच्चांकी आज ४२९ कोरोना रुग्ण सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:18 AM2021-06-25T04:18:10+5:302021-06-25T04:18:10+5:30
करवीर तालुक्यात दुसऱ्या लाटेची सुरुवात एप्रिलमध्ये झाली. मात्र कोरोनाबाधित व यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण अत्यल्प होते. एप्रिल महिन्याच्या ...
करवीर तालुक्यात दुसऱ्या लाटेची सुरुवात एप्रिलमध्ये झाली. मात्र कोरोनाबाधित व यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण अत्यल्प होते. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ५० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने प्रशासन खडबडून जागे झाले. करवीरमधील अनेक गावे हॉटस्पॉट होऊ लागली. पण कडक लॉकडाऊनला जनतेकडून प्रतिसाद मिळत नसल्याने कोरोनाच्या समूह संसर्गाचा मोठा फैलाव झाला आहे.
पहिल्या टप्यात शहरालगतची गावे हॉटस्पॉट झाली पण मेच्या पहिल्या आठवड्यापासून ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार होऊ लागला. तालुक्यात प्रथम दिवसाला १०० कोरोनाबाधितांचा येणारा आकडा आज ४२९ वर पोहोचला. दरोजचा बाधितांचा व मृतांची आकडेवारी पाहता कडक लॉकडाऊननंतरही करवीरमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाला अपयश आल्याचे स्पष्ट झाले आहे आता तर लॉकडाऊन शिथिल झाल्याने पुन्हा समूह संसर्गाचा धोका वाढत आहे.
करवीर तालुक्यात दुसऱ्या लाटेत एप्रिलपासून १४ हजार ३६८ लोकांना आजपर्यंत कोरोनाची बाधा झाली. तर ४१३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. विशेषतः तरुणांचा मृत्यूची संख्या वाढल्याने चिंताजनक परिस्थिती आहे. करवीर तालुक्यातील ५५ गावे हॉटस्पॉट बनली आहेत. बेड मिळत नसल्याने रुग्ण होम आयसोलेशन होत आहेत. उपचार मिळण्यासाठी हयगय होत असल्याने डेथ रेट वाढला आहे.
चौकट अँटिजन टेस्टचाही परिणाम --
गावागावात सध्या ग्रामपंचायतीच्या वतीने अलगीकरण केंद्र उभारण्यात येत आहेत. समूह संसर्गाचा धोका टाळण्यासाठी घर टू घर अँटिजन टेस्ट सुरू करण्यात आल्याने कोरोनाबाधितांचा आकडा वाढू लागला आहे.