शहाणे व्हा भुजबळ, काढू नका मराठ्यांची कळ; कोल्हापुरात सकल मराठा आक्रमक, प्रतिमेला जोडो मारो आंदोलन
By विश्वास पाटील | Published: October 13, 2023 02:03 PM2023-10-13T14:03:32+5:302023-10-13T14:05:38+5:30
भुजबळांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
कोल्हापूर : स्वत: दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेच्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी करून मराठा समाजाचा अवमान केला आहे. दुसऱ्याचे तळवे चाटून सत्तेत बसणाऱ्या भुजबळ यांनी मराठ्यांची कळ काढू नये, ते त्यांना महागात पडेल असा इशारा कोल्हापुरातील सकल मराठा समाजाने शुक्रवारी दिला.
जरांगे-पाटील यांच्या शनिवारी होणाऱ्या सभेतील खर्चावर भाष्य करणाऱ्या मंत्री भुजबळ यांचा सकल मराठा समाजाच्यावतीने येथील शिवाजी चौकात निषेध करण्यात आला. 'मराठ्यांचा अवमान करणाऱ्या भुजबळांचा धिक्कार असो', 'दोन हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्या भुजबळांचे करायचे काय', अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी भुजबळ यांच्या प्रतिमेला जोडे मारुन, काळे फासून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
बाबा इंदूलकर म्हणाले, कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करणाऱ्या भुजबळ यांनी पुन्हा जेलची हवा खायची नसेल तर वेळीच शहाणे व्हावे, त्यांनी मराठा समाजाची कळ काढू नये, अन्यथा त्यांना ते महागात पडेल.
यावेळी विजय देवणे, बाबा पार्टे, दिलीप देसाई, सुनिता पाटील, लता जगताप, गीता हसूरकर, कल्पना शेलार, पद्मावती पाटील, किसन कल्याणकर, जयकुमार शिंदे उपस्थित होते.
भुजबळांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
मंत्री भुजबळ यांनी जरागे-पाटील यांची सभा व ओबीसींना एकत्र येण्याचे आवाहन करत दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मंत्री असणाऱ्या भुजबळ यांनी अशाप्रकारचे वक्तव्य करुन कायदा-सुव्यवस्थेचे उल्लंघन केले आहे. मराठा-ओबीसी यांच्यात शत्रुत्व, दोष पसरविला आहे. त्यांच्या प्रक्षोभक वक्तव्याने त्यांनी मंत्री म्हणून घेतलेल्या शपथेचा भंग झाला आहे. त्यामुळे भुजबळ यांच्यावर कलम १६६, १५३-अ, १०३, १०४ या कलमांखाली गुन्हा दाखल करावा अशी मागणी सकल मराठा समाजाच्यावतीने लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविशान कवठेकर यांच्याकडे केली.