तोतापुरी, डाळिंबांची आवक वाढली, मेथी, कोथिंबिरीचा दर चढाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 11:36 AM2019-06-24T11:36:02+5:302019-06-24T11:38:25+5:30
तोतापुरी आंबा व डाळिंबांची आवक वाढली आहे. कोल्हापुरात तोतापुरीची रोज १0 टन आवक होत असल्याने बाजारात सगळीकडे त्याची रेलचेल दिसते. मेथी, कोथिंबिरीचे दर मात्र चढेच राहिले असून, अजूनही कोथिंबीर ३० रुपये पेंढीच्या खाली येत नाही. कडधान्य बाजारात एकदम शांतता असून, शेंगदाण्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
कोल्हापूर : तोतापुरी आंबा व डाळिंबांची आवक वाढली आहे. कोल्हापुरात तोतापुरीची रोज १0 टन आवक होत असल्याने बाजारात सगळीकडे त्याची रेलचेल दिसते. मेथी, कोथिंबिरीचे दर मात्र चढेच राहिले असून, अजूनही कोथिंबीर ३० रुपये पेंढीच्या खाली येत नाही. कडधान्य बाजारात एकदम शांतता असून, शेंगदाण्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
जून महिना संपत आल्याने मद्रास हापूस पायरीची आवक कमी झाली असून, आता ‘लालबाग’ व ‘नीलम’ आंबे बाजारात दिसू लागले आहेत. त्यांच्या जोडीला तोतापुरी आंब्यांची आवकही सुरू झाली असून, रोज १0 टन तोतापुरी बाजार समितीत येतो; त्यामुळेच फळबाजारासह शहरातील प्रमुख चौकांत तोतापुरीची रेलचेल दिसते.
डाळिंबांची आवक अद्याप कायम आहे. फणस, अननस, पपईची आवक मोठ्या प्रमाणात दिसते. आवक चांगली असल्याने दर मर्यादित राहिले आहेत. लिंबूची मागणी कमी झाल्याने किरकोळ बाजारात १0 रुपयांना पाच ते १0 लिंबू मिळत आहेत.
भाजीपाला बाजारात स्थानिक भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने दर काहीसे तेजीत आहेत. भेंडी, दोडका ६० रुपये किलो, तर वांगी ४० पासून ६० रुपये किलोपर्यंत आहेत. गेल्या आठवड्याच्या तुलनेत बहुतांश भाज्यांचे दर स्थिर राहिले आहेत. वरण्याची आवक कमी असल्याने दर चढे राहिले आहेत.
घाऊक बाजारात ७५ रुपये किलो दर असून, गवारीच्या दरात काहीशी वाढ दिसते. कोथिंबिरीची आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने दर वाढले आहेत. घाऊक बाजारात सरासरी २३ रुपये पेंढी असली, तरी किरकोळ बाजारात किमान ३० रुपये मोजावे लागत आहेत.
मक्का कणसाची आवक वाढली आहे. घाऊक बाजारात सरासरी २५० रुपये शेकडा असले, तरी किरकोळमध्ये १0 रुपये कणसाचा दर आहे. पालेभाज्यांचे दर वाढले असून, मेथी २० रुपये, पोकळा १५ रुपये पेंढी आहे.
पावसाने हुलकावणी दिल्याने कडधान्य बाजार काहीसा शांत दिसतो; त्यामुळे डाळींच्या दरात फारशी चढउतार दिसत नाही. तांदळाच्या दरात प्रतिकिलो दोन ते तीन रुपयांची वाढ दिसते. शेंगांचे दर वाढल्याने शेंगदाणा व शेंगतेलाच्या दरातही वाढ होत आहे.
शेंगदाणा ८० रुपयांवरून १२० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. येत्या आठवड्याभरात शेंगतेलाचा दर १५0 रुपये ओलांडेल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. साखरेचे दर स्थिर असून, घाऊक बाजारात प्रतिक्विंटल ३२०० रुपये दर असला तरी किरकोळ बाजारात तो ३६०० रुपये आहे.
कांदा-बटाटा स्थिर!
कांदा-बटाट्याची आवक थोडी वाढली असून, बाजार समितीत रोज १२ हजार पिशव्यांची आवक होते. घाऊक बाजारात कांदा १३ रुपये, तर बटाटा १५ रुपये किलो आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत लसणाच्या दरात थोडी वाढ दिसते.