चिवट डिफेन्सचा शिलेदार --मिलिंंद इंगवले
By admin | Published: February 7, 2017 01:06 AM2017-02-07T01:06:20+5:302017-02-07T01:06:20+5:30
इतकेच नाही तर टायब्रेकरमध्ये सामनाही जिंंकला.
मिलिंंदची स्थानिक स्पर्धेतील एक आठवण कायमपणे हृदयात कोरलेली आहे. सामना पीटीएम आणि शिवाजी तरुण मंडळ या संघांत होता. सामन्यात सुरुवातीपासून शिवाजी संघ दोन गोलने पिछाडीवर होता. मात्र, शेवटच्या पाच मिनिटांत ‘शिवाजी’ने सामना बरोबरीत आणला. इतकेच नाही तर टायब्रेकरमध्ये सामनाही जिंंकला. यावेळी मिलिंंदने मारलेली पेनल्टी आश्चर्यचकित करणारी होती.
मिलिंंद इंगवले याचा जन्म दि. २ जानेवारी १९६९ रोजी शिवाजी पेठ, कोल्हापूर येथे झाला. त्याला फुटबॉलचा वारसा त्याच्या घराण्याकडूनच मिळाला. त्याचे वडील बाळासाहेब आणि काका गजानन हे शिवाजी तरुण मंडळाचे उत्तम खेळाडू. हाच वारसा नितीन, रणजित आणि मिलिंंद यांनी पुढे चालविला.
वयाच्या सहाव्या वर्षापासूनच मिलिंंद फुटबॉलकडे आकर्षिला गेला. वडील कडक शिस्तीचे. तथापि, त्यांची नजर चुकवून तो लहान मुलांत टेनिसबॉलवर खेळू लागला. मुळात तो वामनमूर्ती. त्यामुळे ४ फूट ११ इंच मापाच्या स्पर्धांत तो दीर्घकाळ खेळला. त्याचे दोन्ही पायांवर कंट्रोल होते. कोणत्याही जागेवर खेळण्याची त्याची तयारी असे. प्राथमिक शाळा पूर्ण होताच मिलिंंद महाराष्ट्र हायस्कूलमध्ये दाखल झाला. क्रीडा प्रशिक्षक वणिरे यांनी त्याचा खेळ पाहून शालेय संघात गरजेप्रमाणे मेन डिफेन्स अथवा हाफ या जागेवर त्याला खेळविले.
मिलिंंद वामनमूर्ती, सरळनाक, शिडशिडीत बांधा, भरपूर स्टॅमिना, धावगती सशासारखी जलद, डोळ्यांत आक्रमकता असणारा मिलिंंद महाराष्ट्र हायस्कूलच्या १९ वर्षांखालील शालेय संघात मेन डिफेन्स या जागेवर खेळू लागला. तो संघात असताना महाराष्ट्र हायस्कूलला महाराष्ट्र राज्यात तीन वेळा प्रथम क्रमांक मिळविता आला. या स्पर्धांत त्याचा डिफेन्सचा खेळ बीड, जळगाव, पुणे येथील मैदाने गाजवून गेला. त्याने आपल्या आक्रमक खेळाने त्या-त्या ठिकाणच्या प्रेक्षकांची मने जिंंकली. याचा परिणाम म्हणून राष्ट्रीय स्पर्धेत एकदा श्रीनगर (काश्मीर) व दुसऱ्यांदा आगरताळा (त्रिपुरा) येथे खेळण्याची त्याला संधी मिळाली. उंचीला कमी असला तरी तो खेळात कोठेही कमी पडला नाही. यावेळी त्याला सलग दोन वर्षे राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली.
बारावीनंतर मिलिंंदने न्यू कॉलेजमध्ये कॉमर्स शाखेकडे प्रवेश घेतला. एव्हाना तो फुटबॉलमध्ये परिपूर्ण झाला होता. फुटबॉलचे सर्व तांत्रिक गमक त्यास समजले होते. सर्व प्रकारच्या किक्स, बॉल ड्रिबलिंंग, बॉडी टॅकलिंंग, फुल व्हाली किक, गोल किक कशातच कसर नव्हती. डिफेन्स आणि हाफचा लाजवाब खेळ पाहून त्याला न्यू कॉलेजच्या संघात लगेच प्रवेश मिळाला. कॉलेजमध्ये खेळताना त्याने शिवाजी विद्यापीठाच्या झोन, इंटरझोनमध्ये त्या काळात प्रथम क्रमांकावर शिक्कामोर्तब केले. शिवाजी विद्यापीठाच्या वेस्ट झोन स्पर्धांकरिता त्याची विद्यापीठ संघात सलग दोन वेळा निवड झाली.
याच वेळी शिवाजी तरुण मंडळ या संघाचे लक्ष मिलिंंदच्या अष्टपैलू खेळाकडे वेधले गेले. शिवाजी संघाकडून तो मेन डिफेन्स आणि हाफ या महत्त्वाच्या जागेवर खेळू लागला. आता स्थानिक स्पर्धेत त्याने आपल्या उत्तम खेळाचे प्रदर्शन घडवून कोल्हापुरी रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळविली. शिवाजी संघाकडून मिलिंदला सांगली, मिरज, गडहिंंग्लज, पुणे, गोवा, आदी ठिकाणी आपला प्रदर्शनीय खेळ सादर करता आला.
शालेय स्तरावर शिवाजी स्टेडियमवर सातारा संघाशी खेळत असताना वणिरे सरांनी मिलिंंदचे वडील बळवंतराव आणि काका गजानन यांना आवर्जून त्याचा खेळ पाहण्यास बोलाविले. त्याचा अष्टपैलू खेळ पाहून वडील आणि काका आनंदाने भारावले.
मिलिंंदची स्थानिक स्पर्धेतील एक आठवण कायमपणे हृदयात कोरलेली आहे. सामना पीटीएम आणि शिवाजी तरुण मंडळ या पारंपरिक विरोधी संघांत होता. शाहू मैदानावर झालेल्या या सामन्यात प्रारंभी शिवाजी मंडळाचा संघ दोन गोलने पिछाडीवर होता. मात्र, शेवटच्या पाच मिनिटांत ‘शिवाजी’ने शिकस्त करून दोन्ही गोल फेडून सामना बरोबरीत आणला. शिवाय टायब्रेकमध्ये सामनाही जिंंकला. यावेळी मिलिंंदने मारलेली पेनल्टी आश्चर्यचकित करणारी होती. मिलिंंद १५ वर्षे फुटबॉल खेळला; पण शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. कॉमर्स विषयात पदवी मिळविली. फुटबॉलच्या प्रसिद्धीमुळे ओळखी वाढल्या. कोल्हापुरात खेळाडू म्हणून ग्लॅमर निर्माण झाले. त्याचा परिणाम पेठेतील बलभीम को-आॅप. बँकेत त्याला लिपिकची नोकरी मिळाली. तो आता ‘बलभीम’चे विलीनीकरण झालेल्या अपना बँकेत कार्यरत आहे.
(उद्याच्या अंकात : सतीश देसाई)
प्रा. डॉ. अभिजित वणिरे