पर्यटन महामंडळाचे कार्यालय कोल्हापुरात पूर्ववत सुरू करणार
By admin | Published: January 8, 2016 12:28 AM2016-01-08T00:28:39+5:302016-01-08T01:01:40+5:30
चंद्रकांत पाटील : भाजपच्या शिष्टमंडळाला ग्वाही
कोल्हापूर : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी)चे कोल्हापूर जिल्ह्यातील सध्या बंद असलेले कार्यालय पुन्हा त्वरित सुरू करावे. त्याचबरोबर या ठिकाणी आवश्यकतेनुसार अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी विनंती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे. हे कार्यालय लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव , विजय जाधव यांच्या शिष्टमंडळाला दिली.
‘एमटीडीसी’चे जिल्ह्यातील प्रादेशिक कार्यालय सध्या बंद आहे. हे कार्यालय परत शहरात सुरू करावे यासाठी विविध संघटना व नागरिकांनी सातत्याने आंदोलने केली आहेत; परंतु महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ८ डिसेंबर २०१५ ला कक्ष अधिकारी (पर्यटन), पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांना पत्र लिहून सोलापूर येथे सुरू करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्याला कोल्हापूरच्या जनतेबरोबरच भारतीय जनता पक्षाने तीव्र विरोध केला आहे. महामंडळाचे उपप्रादेशिक कार्यालय पुन्हा कोल्हापुरात सुरू व्हावे यासाठी, नुकतीच भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, विजय जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुंबईत पालकमंत्री पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी बंद असलेले जिल्ह्यातील कार्यालय पुन्हा त्वरित सुरू करावे. त्याचबरोबर या ठिकाणी आवश्यकतेनुसार अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी विनंती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे. हे कार्यालय लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिली आहे, अशी माहिती उपाध्यक्ष विजय जाधव यांनी पत्रकाद्वारे दिली .