पर्यटन माहिती केंद्र सुरू करणार

By admin | Published: August 18, 2015 11:48 PM2015-08-18T23:48:34+5:302015-08-18T23:48:34+5:30

हॉटेल मालक संघाची तयारी : महापालिकेकडे मागितली जागा, पर्यटकांची गैरसोय होणार दूर

Tourism Information Center to be started | पर्यटन माहिती केंद्र सुरू करणार

पर्यटन माहिती केंद्र सुरू करणार

Next

कोल्हापूर : राज्याच्या कानाकोपऱ्यांतून जेव्हा पर्यटक कोल्हापुरात येतात तेव्हा त्यांना जायचं कु ठं, राहायचं कु ठं, कोल्हापुरात काय-काय पाहायचं, असे अनेक प्रश्न पडतात. त्यांना हमखास माहिती मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होते. पर्यटकांची ही अडचण लक्षात घेऊन कोल्हापूर हॉटेल मालक संघाने ‘पर्यटन माहिती केंद्र’ सुरू करण्याची तयारी दाखविली असून त्यासाठी रेल्वे स्थानक व मध्यवर्ती बसस्थानक परिसरात जागा मागितली आहे. कोल्हापूर शहरात पूर्वी महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाचे एक पर्यटन माहिती केंद्र मध्यवर्ती बसस्थानकावर कार्यरत होते; परंतु हे कार्यालय पुणे येथे हलविण्यात आले. त्यानंतर अधिकृत अशी माहिती देणारे केंद्र सध्या कोल्हापुरात नाही. त्यामुळे जेव्हा पर्यटक कोल्हापुरात पाय ठेवतो, त्यावेळी त्याच्यासमोर वेळ आणि पैसे याच्या ताळमेळ घालून शहरात काय-काय पाहावे, कुठे आणि कोणत्या हॉटेलमध्ये राहावे, यात्री निवास कुठे आहेत, भोजनाची व्यवस्था कुठे चांगली होऊ शकते याबाबतची कसलीच माहिती मिळत नाही. अशावेळी रिक्षाचालक त्यांना घेऊन तोडकी-मोडकी माहिती देतात. रिक्षाचालकांचा भाड्यापुरता संबंध असल्याने त्यांच्याकडून पक्की व खात्रीशीर माहिती मिळेलच याची शाश्वती नसते. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यांतून येणाऱ्या पर्यटकांची मोठी गैरसोय होते.
पर्यटकांची ही अडचण लक्षात घेऊन कोल्हापूर हॉटेल मालक संघाने त्यात पुढाकार घेतला असला तरी संघासमोरही जागेचा प्रश्न आहे. त्यासाठी संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर, सचिव शशिकांत माळकर, आनंद माने, अरुण चोपदार आदींनी महापौर वैशाली डकरे यांची भेट घेऊन पर्यटन माहिती केंद्र सुरू करण्याबाबतचा विचार बोलून दाखविला. मध्यवर्ती बसस्थानक किंवा रेल्वे स्थानक परिसरात दहा बाय दहा स्केअर फुटाची जरी जागा उपलब्ध करून दिली गेली तर असे केंद्र सुरू करता येणे शक्य असल्याचे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर डकरे यांना पटवून दिले. महापौरांनीही याकामी सहकार्य करण्याचे ठरविले आहे. (प्रतिनिधी)


पर्यटन माहिती केंद्र सुरू झाल्यास बाहेरगावच्या पर्यटकांना योग्य मार्गदर्शन होईल. त्यांचा वेळ वाचेल आणि त्यांच्या बजेटप्रमाणे सर्व नियोजन करणे शक्य होईल. ‘कोल्हापूर दर्शन’साठी के.एम.टी. बस सुरू केली तर शहरातील सर्व हॉटेल्सवर त्याच्या बुकिंगची सोयही उपलब्ध केली जाईल.
- आनंद माने


मनपा सभेत जागेचा ठराव होणार
गुरुवारी होणाऱ्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौरांनी सदस्य ठरावाद्वारे ही अशी जागा देण्यासाठी प्रस्ताव ठेवला आहे. पर्यटन माहिती केंद्र सुरू करण्यासाठी मनपाने जागा दिली की हॉटेल मालक संघ तेथे आपला कर्मचारी ठेवून पर्यटकांना माहिती देईल.

Web Title: Tourism Information Center to be started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.