Kolhapur: मसाई पठारावरील पर्यटनाला चालना मिळणार, पांडवकालीन लेणी परिसराचे संवर्धन अंतिम टप्प्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 04:02 PM2024-06-20T16:02:59+5:302024-06-20T16:03:17+5:30
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठे टेबल लँड म्हणून प्रसिद्ध
नितीन भगवान
पन्हाळा : मसाई पठारावरील मसाई मंदिरापासून जवळच असणाऱ्या पांडवदरा लेण्यांचे राज्य पुरातत्व विभागाकडून संवर्धनाचे काम अंतिम टप्प्यात असून, यामुळे पठारावरील पर्यटनास चालना मिळणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठे टेबल लँड म्हणून प्रसिद्ध असणारे, पावसानंतर फुलांनी बहरणारे, शासनाने राखीव संवर्धन क्षेत्र म्हणून घोषित केलेले निसर्गरम्य मसाई पठार. याच पठाराच्या पश्चिमेला मसाई देवीच्या मंदिरापासून हाकेच्या अंतरावरील ''पांडवदरा'' नावाच्या दरीत पुरातन लेण्या आहेत. या लेण्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होत्या. जोतिबा परिसरातील पोहाळे येथील लेणी आणि मसाई पठारावरील लेणी यामध्ये बरेच साधर्म्य आढळते. स्थानिक या लेण्यांना पांडवलेणी असे संबोधतात. अलीकडील काळात काही संशोधकांच्या मते या गुहा बौद्धकालीन असाव्यात, असा अंदाज व्यक्त केल्यानंतर गेल्या काही वर्षांत बौद्ध संघटनांतर्फे या परिसरात बुद्ध जयंती साजरी करण्यात येते.
अलीकडे या लेणी परिसरात पर्यटकांकडून होणाऱ्या ओल्या पार्ट्या, कचऱ्याचे साम्राज्य, यामुळे या परिसरास अवकळा प्राप्त झाली होती. या गुहांच्या परिसरात बारमाही वाहणारा थंड पाण्याचा झरा असून, हा परिसर वनविभागाच्या ताब्यात असल्यामुळे येथे सोयीसुविधा करण्यास अडचणी येत होत्या.
या लेण्यांचे संवर्धन व संरक्षण व्हावे, यासाठी परिसरातील नागरिक व इतिहास, निसर्गप्रेमींबरोबरच लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे शासन स्तरावर हालचाली होऊन वनविभागाच्या ताब्यात असणारा हा परिसर राज्य पुरातत्व खात्याकडे वर्ग केला. राज्य शासनाच्या पुरातत्व विभागाने या लेण्यांचे संवर्धन व सुशोभीकरणास निधी उपलब्ध करून कामाला सुरुवात केली आहे. गुहांमधील खांबांचे बांधकाम व मजबुतीकरण, चौथऱ्यांचे बांधकाम, गुहांच्या वरील बाजूस संपूर्ण ग्रीलचे संरक्षण कुंपण तसेच दरीत उतरण्यासाठी सुशोभित पायऱ्यांचे बांधकाम केले आहे. हा परिसर स्वच्छही केला आहे. त्यामुळे या परिसराचे सौंदर्य खुलून दिसत आहे. याच गुहांच्या समोरून वाहणाऱ्या बारमाही झऱ्यांचे संवर्धन होणार आहे. या लेण्यांचे संवर्धन व सुशोभीकरणामुळे मसाई पठारावर येणाऱ्या पर्यटकांबरोबरच नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
जत्रांवर बंदी गरजेची
मसाई पठाराचे पावित्र्य जपण्यासाठी येथे असणाऱ्या गुहांमध्ये होणाऱ्या ओल्या पाटर्या, जत्रा यावर बंदी घालण्याची गरज आहे. वनविभाग व राज्य पुरातत्त्व खात्याने याची जबाबदारी घ्यावी.