मसाई पठारचा पर्यटनदृष्ट्या विकास होणार

By admin | Published: December 13, 2015 11:07 PM2015-12-13T23:07:38+5:302015-12-14T00:09:43+5:30

पठाराचे सौंदर्य खुलणार

Tourist tour of Masai Plateau will be developed | मसाई पठारचा पर्यटनदृष्ट्या विकास होणार

मसाई पठारचा पर्यटनदृष्ट्या विकास होणार

Next

पन्हाळा : मसाई पठार पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत असताना निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी व गिरीभ्रमण करणाऱ्या पर्यटकांसाठी एक नवी पर्वणी उपलब्ध होणार आहे.पन्हाळगडापासून या विस्तीर्ण पठाराची मालिका सुरू होते. गिरीभ्रमण आणि ट्रेकिंगची आवड असणाऱ्या निसर्गप्रेमी मंडळींना मसाई पठारावरील भ्रमण एक वेगळीच अनुभूती मिळवून देते. याच पठारावर पन्हाळा-शाहूवाडी तालुक्यातील प्रसिद्ध मसाईदेवीचे मंदिर, पुरातन पांडवदरा या गुहांच्या समोरील पाण्याचे झरे अशा विस्तीर्ण पठारावरील ‘ईश्वर-म्हादू’ तलाव, आदी ठिकाणे पर्यटकांना निश्चितच मोहित करतील. ‘ईश्वर-म्हादू’ तलावावर स्थलांतरित पक्ष्यांचाही वावर असतो. त्यामुळे पक्षी निरीक्षण करणाऱ्या मंडळींना पक्षी निरीक्षणाचा आनंद लुटता येईल.
छत्रपती शिवाजी महाराज याच मार्गाने पन्हाळा गडावरून विशाळगडाकडे गेले होते. त्यामुळे या पठाराला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. शिवरायांचे सुपुत्र युवराज संभाजी महाराजांचे या परिसरात काही काळ वास्तव्य होते. बाराद्वारी (बांदेवाडी) या ठिकाणी त्यांनी बराच काळ वास्तव्य केले होते. इतिहासाची आठवण करून देणारा हा परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत असल्याने पर्यटकांसाठी एक नवी पर्वणी उपलब्ध होणार आहे.पन्हाळगडाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, शाहू महाराजांच्या कल्पकतेतून साकारलेले ‘फोर्ट टी’ तयार करणारे चहाचे मळे, म्हाळुंगे गावातील खाली मुबलक पाणी असणारी विहीर, विस्तीर्ण आणि निसर्गाच्या विविध पैलूंची उधळण करणारा परिसर निसर्गप्रेमी पर्यटकांना पर्वणीच ठरणार आहे.मसाई पठार विकास प्रकल्पाची लवकरात लवकर सुरुवात व्हावी, अशी अपेक्षा मसाई कृषी सेवा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब भोसले व उपाध्यक्ष पी. आर. भोसले यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)

पठाराचे सौंदर्य खुलणार
जैवविविधतेने नटलेल्या या मसाई पठारावर विविध औषधी वनस्पती व शेवाळ पावसाळ्याच्या हंगामात उगवून येतात. याची जपणूक होत असताना याचाही पर्यटकांना व वनस्पतीशास्त्र शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून त्याची जपणूक झाली पाहिजे, अशी मागणी पर्यावरण विद्यार्थ्यांनी केली आहे. निसर्गाचा समतोल राखूनच संपूर्ण मसाई पठारचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा, त्याचबरोबर छत्रपतींच्या पाऊलखुणा जपल्या जाव्यात, अशीही मागणी इतिहासप्रेमींनी केली आहे.

Web Title: Tourist tour of Masai Plateau will be developed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.