पर्यटक, भाविकांनी जोतिबा, अंबाबाई मंदिरांत जाणे टाळावे: जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 02:53 PM2020-03-16T14:53:10+5:302020-03-16T14:56:34+5:30
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पर्यटक, भाविकांनी जोतिबा, अंबाबाई मंदिर, नृसिंहवाडी, संत बाळूमामा मंदिर या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत्रकार परिषदेत केले. उद्याने, गड, किल्ले या ठिकाणी सामूहिक सहली काढू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले.
कोल्हापूर : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पर्यटक, भाविकांनी जोतिबा, अंबाबाई मंदिर, नृसिंहवाडी, संत बाळूमामा मंदिर या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत्रकार परिषदेत केले. उद्याने, गड, किल्ले या ठिकाणी सामूहिक सहली काढू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिक, भाविक व पर्यटकांनी जिल्ह्यातील अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिर, सद्गुरू बाळूमामा मंदिर, नृसिंहवाडी अशा मोठ्या मंदिरांमध्ये दर्शनास जाणे काही काळ टाळावे.
जिल्ह्यातील मनोरंजनाच्या विविध ठिकाणी जसे सिनेमागृह, नाट्यगृह, वॉटर पार्क, बगीचे, जलतरण तलाव, किल्ले, इत्यादी ठिकाणीही नागरिकांनी जाऊ नये; सहली काढू नयेत; त्या ठिकाणी गर्दी करू नये. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये निवेदन देण्यासाठी समूहाने येऊ नये. त्याचबरोबर निवेदन विनंती-अर्ज, इत्यादी टपालाद्वारे पाठवावेत अथवा एखाद्या व्यक्तीने येऊन द्यावे.
ग्रामीण भागातील सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था ३१ मार्चपर्यंत बंद राहतील; परंतु सर्व शाळांतील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, इतर कर्मचारी यांनी मात्र शाळेत, कार्यालयात पूर्णवेळ उपस्थित राहणे बंधनकारक राहणार आहे.
ते पुढे म्हणाले, ग्रामीण भागात तलाठी, ग्रामसेवक यांना गावपातळीवर सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर अंगणवाडी सेविका, ‘आशा’ वर्कर्स यांना घराघरांत जाऊन कोरोनासंदर्भात जनजागृती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले, कोरोनाच्या जनजागृतीसाठी एक लाख ७५ हजार हस्तपत्रिका छापून त्यांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर आठ हजार ६०० स्टिकर्स व पोस्टर्स व ५० होर्डिंगही शहरात लावण्यात आली आहेत.
जीवनावश्यक वस्तूंची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाईसाठी पथके
जिल्ह्यातील धान्य व डिझेल साठ्यांसंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तूंची जादा दरांनी विक्री करणाऱ्यांवर कारवाईसाठी अन्न व औषध प्रशासन, वैधमापन विभाग, जिल्हा पुरवठा अधिकारी यांची पथके तयार करण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.