करवीरनगरीत पर्यटकांचा अपेक्षाभंग
By admin | Published: December 27, 2014 12:11 AM2014-12-27T00:11:11+5:302014-12-27T00:19:51+5:30
पर्यटनस्थळांची उपेक्षा : अस्वच्छ रंकाळा, प्रदूषित पंचगंगा, दुर्लक्षित साठमारी, शहर ठरत आहे 'व्हाया' पुरते मर्यादित
इंदुमती गणेश - कोल्हापूर -साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबाबाई, श्रीक्षेत्र जोतिबासह धार्मिक अधिष्ठान, छत्रपती शाहूरायांची नगरी अशी ख्याती असलेल्या कोल्हापुरात आता पर्यटकांना न्यू पॅलेस वगळता पाहण्यासारखे एकही स्थळ राहिलेले नाही. त्यामुळे सुट्यांच्या कालावधीत ओसंडून वाहणारे पर्यटक देवीचे दर्शन घेऊन आल्या पावली परततात. एकीकडे कोल्हापूरला तीर्थक्षेत्र निधी मिळावा म्हणून आराखड्यांवर आराखडे तयार केले जाताहेत, तर दुसरीकडे स्थानिक पातळीवर प्रशासनाचा शून्य सहभाग आहे. अशा परिस्थितीत कोल्हापूरचा पर्यटन विकास कसा होणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
करवीरनिवासिनी अंबाबाई व जोतिबा, नृसिंहवाडी येथील दत्त दर्शनासाठी मिळून वर्षाकाठी २०-२२ लाखांपर्यंत पर्यटक येतात. ख्र्रिसमसच्या सुटीच्या निमित्ताने गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. अंबाबाई मंदिराबाहेर भाविकांच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसतात. शहराला धार्मिक-ऐतिहासिक महत्त्व आहेच; शिवाय जिल्ह्याला निसर्गाने भरभरून वरदान दिले आहे; त्यामुळे भाविक पर्यटनाला ‘व्हाया कोल्हापूर’
जातात; पण येथे पर्यटकांना आकर्षित करणारे, त्यांना प्रसन्न करणारी ठिकाणे किती, हा प्रश्न निर्माण होत आहे. कोल्हापूरची अस्मिता असलेला रंकाळा तलाव आता मरणयातना भोगतोय. येथे आल्यावर पर्यटकांना हिरव्यागार पाण्याशिवाय दुसरे काही पाहता येत नाही. बोटिंगसारखी मनोरंजनाची सुविधा नाही. शाहू महाराजांचे वेदोक्त प्रकरण घडले तो पंचगंगा घाट आणि नदीचे पात्र कोल्हापूरच्याच नागरिकांनी अस्वच्छ करून टाकले आहे.
न्यू पॅलेसचे म्युझिअम सोडले, तर आता शहरात पाहण्यासारखे काहीच नाही. कपिलेश्वरसारखे ग्रामदैवत, साठमारी ही स्थळे दुर्लक्षित आहेत. शाहू जन्मस्थळाच्या वास्तूचे काम पूर्ण व्हायचे नाव घेत नाही. बाहेरील पर्यटकांना कोल्हापूरची माहिती असेलच तर ते शहरापासून बाहेर म्हणजे फार-फार तर जोतिबा, पन्हाळा आणि गोकुळ शिरगावमधील कणेरी मठ या ठिकाणी जातात. नव्याने आलेल्या पर्यटकाला याची माहिती नसल्यास शहरात त्याचा हिरमोड होतो. आणि ते महालक्ष्मीचे दर्शन घेऊन कोकण किंवा गोव्याचा पर्याय स्वीकारतात.
पर्यटनाविकासासाठी कृतिशील आराखडा तयार करून त्यावर योग्य अमलबजावणी झाली पाहिजे.
इतर शहराच्या तुलनेत कोल्हापुरात पर्यटकांना आकर्षित करण्याचे
पर्याय आहेत. मात्र, त्यांची निगा
आणि सौंदर्य वाढवण्यावर भर दिला पाहिजे. तरच कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांना पुन्हा पुन्हा येथे यावेसे वाटेल.
प्रशासकीय पातळीवरच अनास्था
तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर होऊन हा प्रकल्प कधी पूर्ण होणार याचे भाकीत देवी अंबाबाईही कधी करू शकणार नाही. तोपर्यंत भाविकांचे हाल होताहेत. त्यावर तात्पुरत्या स्वरूपात तरी उपाययोजना करण्याची मानसिकता प्रशासकीय पातळीवर नाही. कालपासून देवीच्या दर्शनासाठीच्या भवानी मंडपापर्यंत रांगा येत आहेत; पण इथे उन्हाचे चटके सोसत भाविकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. पिण्यासाठी पाण्याचीही सोय नाही. क्षणभर कु ठे विसावा घ्यायचा म्हटले, तर तशी जागा नाही. पार्किंगदेखील हाउसफुल्ल. मंदिरानजीक जाणाऱ्या रस्त्यांवर ट्रॅफिक जॅम असते.
पर्यटक स्थिरावणार कोठे ?
कोल्हापुरात पर्यटक आले की पहिला प्रश्न येतो, थांबायचे कोठे ? जास्तीचे पैसे भरून धर्मशाळा, लॉज, घरगुती यात्री निवासांमध्ये आसरा घेतला जातो. देवीचे दर्शन झाल्यानंतर जेवणाचा आस्वाद घेतला की भाविक आल्यापावली पुढच्या प्रवासाला निघतात. कोल्हापुरात दोन दिवस थांबून आसपासची पर्यटन स्थळे पाहण्यासाठीच्या सुविधा येथे उपलब्ध नाहीत. ‘कोल्हापूर दर्शन’सारखी बस नाही; त्यामुळे पर्यटनाला अन्य ठिकाणी जायचे; पण व्हाया कोल्हापूर. अशा परिस्थितीत कोल्हापुरात पर्यटक स्थिरावणार कसा ?