बर्की धबधब्यावरील पर्यटक सुरक्षितपणे माघारी परतले; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 10:44 PM2022-07-04T22:44:21+5:302022-07-04T22:44:43+5:30
अतिवृष्टी काळात धबधब्यांच्या ठिकाणी जाणे टाळा : जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन
अणूस्कुरा : मागील दोन दिवसांपासून शाहूवाडी पश्चिम भागात अणूस्कुरा व गेळवडे धरण परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे कासारी नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. मुसळधार पावसामुळे बर्की धबधबा प्रवाहीत झाल्याने याठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढली होती. परंतु अचानक पाऊस वाढल्यामुळे बर्की बंधारा पाण्याखाली गेला अन् पर्यटक गावातच अडकले होते. आता त्यांची सुटका झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील बर्की धबधबा पाहण्यासाठी आज दुपारी 2 वाजता कोल्हापूर येथून 2 मिनीबस व 8 कार मधून अंदाजे 70- 80 पर्यटक गेले होते. परतीच्या प्रवासावेळी सायंकाळी 5 वाजता बर्की गावाजवळील ताफेरा ओढा तसेच कासारी नदीवरील पुलावर पाणी आल्याने सर्व प्रवासी अडकले होते. दोन्ही ठिकाणची पाणी पातळी ओसरल्यावर सर्व वाहने व प्रवासी सुखरुप बाहेर पडली आहेत. या प्रवाशांना धीर देण्यासाठी व त्यांच्या सोयीसाठी बर्की ग्रामस्थ, तरुण मंडळाचे अध्यक्ष, गावकरी, रेशन दुकानदार व वनरक्षक त्यांच्या सोबत होते.
अतिवृष्टी होत असताना पर्यटकांनी सुरक्षेचा उपाय म्हणून बर्की धबधब्यासह जिल्ह्यातील इतर सर्व धबधब्यांच्या ठिकाणी वर्षा सहलीला जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.