बाहेरगावाहून आलेले पर्यटक परतीच्या मार्गावर, कोल्हापुरात अंबाबाई दर्शनाला गर्दी

By संदीप आडनाईक | Published: November 19, 2023 07:23 PM2023-11-19T19:23:44+5:302023-11-19T19:23:57+5:30

दिवाळीची सुटीला जोडून पर्यटनासाठी बाहेर पडलेले पर्यटक आणि भाविकांमुळे कोल्हापूर हाऊसफुल झाले होते.

Tourists from out of town on their way back, crowded to see Ambabai in Kolhapur | बाहेरगावाहून आलेले पर्यटक परतीच्या मार्गावर, कोल्हापुरात अंबाबाई दर्शनाला गर्दी

बाहेरगावाहून आलेले पर्यटक परतीच्या मार्गावर, कोल्हापुरात अंबाबाई दर्शनाला गर्दी

कोल्हापूर : दिवाळीची सुटीला जोडून पर्यटनासाठी बाहेर पडलेले पर्यटक आणि भाविकांमुळे कोल्हापूर हाऊसफुल झाले होते. मात्र, सलग सुटी संपल्यामुळे बाहेरगावांहून आलेल्या पर्यटकांनी रविवारी परतीचा मार्ग स्वीकारला. मात्र, कोल्हापूर शहरासह परिसरातील धार्मिक आणि पर्यटनस्थळांवर गर्दी होती. दरम्यान, विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर दुपारनंतर शुकशुकाट होता.

दिवाळीची सुटीदरम्यान शाळांनाही सुटी असल्यामुळे बहुतेक सर्व जण कुटुंबीयांसह पर्यटनासाठी बाहेर पडलेले होते. पुणे, मुंबईहून आलेल्या पर्यटकांनी एस.टी. बस, रेल्वे, खासगी आराम बसचेही परतीचे आरक्षण केलेले होते. त्यामुळे सलग मिळालेली दिवाळीची सुटी आणि शाळांना दिलेली सुटी आज संपल्यामुळे शहर आणि जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवरून पर्यटक परतीच्या वाटेवर होते.

दरम्यान, करवीरनिवासिनी अंबाबाई देवी, जोतिबा डोंगर, न्यू पॅलेस, किल्ले पन्हाळगड, नरसोबाची वाडी, गगनबावडा, आदी ठिकाणी राज्यासह परराज्यांतील मोठ्या प्रमाणात दाखल झालेले पर्यटकही परतत आहेत. शहरातील महाद्वार रोड, ताराबाई रोड, जयोतिबा रोड, खासबाग, भाऊसिंगजी रोड, छत्रपती शिवाजी चौक, चप्पल लाइन, पापाची तिकटी, आदी परिसरात पर्यटकांची तुरळक गर्दी आहे. मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाल्याने शहरातील खासगी यात्री निवास, महालक्ष्मी धर्मशाळा, आदींसह घरगुती राहण्याची ठिकाणेही हाऊसफुल झाली होती.

दरम्यान, विश्चचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यामुळे शहराच्या प्रमुख मार्गांवर रविवारी शुकशुकाट असल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र दिसत नव्हते. बाहेरगावचे पर्यटक आणि भाविकांच्या गाड्या पार्किंगसाठी बिंदू चौक, ताराबाई रोड, शिवाजी स्टेडियम परिसरांत लागलेल्या आहेत.

अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी

अंबाबाई मंदिरात देवीदर्शनासाठी सकाळी सहा वाजल्यापासून भाविकांची गर्दी असल्याचे चित्र रविवारी दिवसभर दिसत होते. मात्र, विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमुळे अनेक जण रविवारी परतीच्या वाटेवर होते. शाळाही आज, सोमवारी सुरू होत असल्यामुळे पर्यटकांनी जवळचे पर्यटनस्थळ म्हणून टाऊन हॉल संग्रहालय, न्यू पॅलेस येथील छत्रपती म्युझियम पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली हाेती. नृसिंहवाडी, कणेरी मठ, किल्ले पन्हाळगड, ज्योतिबा डोंगर ही ठिकाणे क्रमाने पाहून पर्यटक कोकण, गोवा पाहून परतत आहेत.

Web Title: Tourists from out of town on their way back, crowded to see Ambabai in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.