पर्यटनाला फटका! पर्यटकांना कोरोनाची धास्ती, बुकिंग रद्द करण्यासाठी घाई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 11:54 AM2022-12-31T11:54:30+5:302022-12-31T12:46:25+5:30

गेल्या दोन वर्षांतील कोरोनाकाळातील स्थिती लक्षात घेऊन ते पर्यटनासाठी केले बुकिंग रद्द

Tourists have canceled advance bookings due to the fear of Corona | पर्यटनाला फटका! पर्यटकांना कोरोनाची धास्ती, बुकिंग रद्द करण्यासाठी घाई

पर्यटनाला फटका! पर्यटकांना कोरोनाची धास्ती, बुकिंग रद्द करण्यासाठी घाई

Next

कोल्हापूर : जगातील विविध देशांमध्ये कोल्हापुरातून पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांमध्ये कोरोनाची धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे विमान प्रवास, परदेशातील हॉटेलमध्ये केलेले ॲडव्हॉन्स बुकिंग (आगाऊ नोंदणी) रद्द करण्यासाठी त्यांची घाई सुरू आहे. मात्र, आपल्या देशातील बहुतांश नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने घालून दिलेल्या नियमावलीवर विश्वास ठेवून त्याचे पालन योग्य पद्धतीने करून बिनधास्त पर्यटनाचा आनंद घ्या, असे आवाहन कोल्हापुरातील ट्रॅव्हल्स एजंटांनी केले आहे.

कोल्हापुरातून दरवर्षी दुबई, थायलंड, सिंगापूर, मलेशिया, अमेरिका, लंडन आदी देशांमध्ये सुमारे ७ हजार लाेक पर्यटनासाठी जातात. त्यातील काहीजण नातेवाइकांना भेटण्यासाठी लंडन, अमेरिकेला जातात. पर्यटनाला जाण्यासाठी नोव्हेंबरपासून नागरिक बुकिंग करतात. नववर्षातील पर्यटनासाठी आतापर्यंत सुमारे ११०० जणांनी बुकिंग केले आहे; पण गेल्या १५ दिवसांपासून सोशल मीडिया आणि विविध माध्यमांतून जगभरातील कोरोना प्रादुर्भावाची येणाऱ्या माहितीमुळे पर्यटकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. 

गेल्या दोन वर्षांतील कोरोनाकाळातील स्थिती लक्षात घेऊन ते पर्यटनासाठी केलेले बुकिंग रद्द करण्यासाठी ट्रॅव्हल्स एजंटांशी प्रत्यक्षात, दूरध्वनीवरून घाई करत आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूरच्या संचालक मंडळाची शुक्रवारी बैठक झाली. पर्यटकांनी कोरोनाची धास्ती टाळावी, अफवांवर विश्वास ठेवू नये. पर्यटनाचा मनमुराद आनंद घ्यावा, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष बळीराम वराडे यांनी केले.

देश-विदेशातील सर्व सहली फुल्ल आहेत. देशातील काश्मीर, राजस्थान, केरळकडे पर्यटकांचा ओढा आहे. गेली दोन वर्षे युरोपमधील पर्यटन खुले झाले आहे. तिकडे पर्यटकांचा कल वाढला आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटनविषयक असलेली संपूर्ण नियमावली पर्यटकांना सांगितली जाईल. ‘आरटी-पीसीआर’ चाचणी पर्यटनाहून आल्यानंतर केली जाईल. एअर लाइन्सकडून वेळोवेळी मिळालेल्या सूचना, माहिती पर्यटकांना देण्यात येतील, असे वराडे यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष रवि पोतदार, सचिव अमित चौकले, उमेश पवार, संचालक विनोद कांबोज उपस्थित होते.

Web Title: Tourists have canceled advance bookings due to the fear of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.