कोल्हापुरातील पर्यटकांची युरोपमध्ये अडवणूक
By admin | Published: May 29, 2016 12:59 AM2016-05-29T00:59:11+5:302016-05-29T00:59:11+5:30
पैशासाठी अडवणूक करून मानसिक कोंडमारा
कोल्हापूर : युरोप सहलीवर गेलेल्या कोल्हापूर आणि बेळगाव येथील पर्यटकांची पैशासाठी अडवणूक करून त्यांचा मानसिक कोंडमारा करण्याचा प्रकार सुरू आहे. या पर्यटकांमधीलच एकाने अॅमस्टरडॅम येथून मोबाईलवरून ‘लोकमत’ला ही माहिती दिली.
याबाबत माहिती अशी, कोल्हापुरातील एका टूर्स अॅड ट्रॅव्हर्ल्सच्या माध्यमातून कोल्हापुरातील चार, बेळगावचे चार, पुण्यातील एक डॉक्टर यांच्यासह १२ पर्यटक लंडनमध्ये मुख्यालय असलेल्या एका ट्रॅव्हल्स कंपनीमार्फत मुंबईतून १९ मे रोजी युरोप सहलीवर गेले आहेत. यासाठी प्रती माणसी २ लाख ४0 हजार रुपये भरून घेण्यात आले आहेत. यामध्ये युरोपमधील सर्व प्रमुख स्थळांच्या भेटी, जेवण, निवासस्थान, आदी सोयी-सुविधांचा समावेश होता. १८ मे रोजी इटलीतील रोम विमानतळावर ते उतरले. तेथूनच त्यांच्या अडचणींना सुरुवात झाली. विमानतळावर त्यांना न्यायला येणारे वाहन तब्बल तीन तास उशिरा आले. निवास आणि इतर सोयी ही यथा तथाच देण्यात येत आहेत. इटली नंतर ते व्हेनीसला गेले, पण टोलचे पैसे न भरल्याने त्यांना व्हेनीसमध्ये प्रवेश दिला गेला नाही. विशेष म्हणजे या पर्यटकांमध्ये कोल्हापुरातील ‘त्या’ टुर्स अॅँड ट्रॅव्हल्सचे चालकही सपत्निक आहेत. टोल आणि इतर सुविधांसाठी ९५0 युरो तातडीने द्या, अशी मागणी या चालकांकडे त्या कंपनीने केली. सध्या आमच्याकडे पैसे नाहीत, मुंबईत गेल्यावर आम्ही देऊ असे त्यांनी सांगितले, मात्र पैसे न दिल्याने त्यांच्या नियोजित पर्यटनस्थळांच्या भेटीमध्ये कपात करण्यात आली. व्हेनीस नंतर आॅस्ट्रिया, स्विर्त्झलँन्ड, जर्मनी करत शनिवारी ते नेदरलँडमधील अॅमस्टरडॅम येथे पोहचले. तेथेही त्यांना हॉटेल बाहेर सोडून चालक निघून गेला. तब्बल तीन-चार तास तो आलाच नाही. या त्रासाला कंटाळून अखेर त्यातील रमेश सरनाईक या पर्यटकाने ‘लोकमत’शी मोबाईलवरून संपक साधून आपली कशी फसवणूक केली जात आहे. कसा मानसिक त्रास दिला जात आहे, याची माहिती दिली. शासकीय सेवेत असलेले सरनाईक हे मुळचे कोल्हापुरचे आहेत. सध्या ते ठाण्यात राहतात. कोल्हापुरातील टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्सच्या संबंधितानी कोल्हापूर पोलिसानांही या फसवणुकीची माहिती दिली असल्याचे सांगितले.
कोल्हापूर पोलिसांनी मात्र असा कोणताही दूरध्वनी आल्याचा अथवा तक्रार आल्याचा इन्कार केला. हे पर्यटक भारतीय प्रमाण वेळेनुसार शनिवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास अॅमस्टरडॅमहून ब्रुसेल्समार्गे पॅरिसकडे रवाना झाले आहेत. तेथून ते लंडन, स्कॉटलंडमधील पर्यटनस्थळे पाहणार आहेत. ५ जून रोजी लंडन येथून विमानाने भारताकडे प्रयाण करणार आहेत. अबुधाबीमार्गे ते ६ जूनला मुंबईत उतरतील, असेही सरनाईक यांनी सांगितले.