पर्यटकांचा आता दुर्गम भागातील धबधब्यांकडे मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:16 AM2021-07-22T04:16:24+5:302021-07-22T04:16:24+5:30
कोल्हापूर : एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटक गर्दी करत आहेत. लोकप्रिय आणि प्रसिद्ध पर्यटन ...
कोल्हापूर : एकीकडे कोरोनाचे रुग्ण वाढत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटक गर्दी करत आहेत. लोकप्रिय आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळांऐवजी जंगल भागात असलेल्या अपरिचित स्थळांकडे या पर्यटकांचा मोर्चा सध्या वळलेला दिसतो, मात्र, यामुळे शहरातून आणलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्याचा ढीग हे पर्यटक परतताना तेथेच सोडून येत असल्याने पर्यावरण धोक्यात आले आहे.
राऊतवाडी, आंबोली, गगनबावडा, आंबा, पन्हाळा येथील पर्यटन स्थळांवर बंदोबस्त असल्याने हुल्लडबाज पर्यटकांचा मोर्चा शनिवारी आणि रविवारी राधानगरी, आजरा, शाहुवाडी, पन्हाळा तालुक्यातील दुर्गम आणि दाट जंगलातील पर्यटन स्थळांकडे वळला आहे. पर्यटनाला बंदी असली तरीही राधानगरी तालुक्यातील काळम्मावाडीच्या परिसरातील तोरस्कर वाडी-आडोली येथील धबधबा या हौशी पर्यटकांमुळे भरुन गेला आहे. व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून याची प्रसिध्दी वाढली आणि त्यामुळे ज्यांना माहितीच नाही, असेही अनेक पर्यटक या भागाकडे येऊ लागले आहेत.
चौकट
जागतिक वारसास्थळांच्या यादीतील ठिकाणांना धोका
जागतिक वारसास्थळांच्या ‘युनेस्को’च्या यादीतील वाकीघोल परिसर हा पश्चिम घाटाचा महत्त्वाचा भाग आहे. हे स्थान टिकवायचे असेल तर येथील जैवविविधता जपली पाहिजे. मात्र, असे करण्याऐवजी पावडर वापरून मासेमारी करणे, वन्यप्राण्यांची चोरटी शिकार करणे, फटाक्यांची आतषबाजी करणे, प्लास्टिकचा कचरा तयार करणे अशा पर्यावरणाला मारक घटना येथे घडत आहेत. यामुळे निसर्गाला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होत आहे.
या भागातील धबधबा पाहायला बाहेरूनही हुल्लडबाज पर्यटक येऊ लागले आहेत. त्याचबरोबर या भागातील महिलांना त्यांचा त्रास होत आहे. यासाठी वाकीघोलमधील गावकऱ्यांनी पोलीस, जिल्हा प्रशासन, वन विभाग यांच्याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्था, कोरोना प्रतिबंधक समिती, तंटामुक्त समितीत काम करणाऱ्या सर्वांनी अशा पर्यटकांना रोखून जैवविविधता वाचवावी.
- व्ही. पी. पाटील,
आडोली काळम्मावाडी, ता. राधानगरी.