शहर पूर्वपदाकडे, वाहनांची वर्दळ वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:29 AM2021-06-09T04:29:21+5:302021-06-09T04:29:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोना नियंत्रणासाठी लागू केलेला लॉकडाऊन काही प्रमाणात सरकारने शिथिल केल्याने दुसऱ्यादिवशी मंगळवारी शहर पुन्हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोना नियंत्रणासाठी लागू केलेला लॉकडाऊन काही प्रमाणात सरकारने शिथिल केल्याने दुसऱ्यादिवशी मंगळवारी शहर पुन्हा पूर्वपदावर येत राहिले. शहराचे अर्थचक्र फिरण्यास सुरुवात झाली. बाजारपेठेत विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी झाली होती. वाहनांची वर्दळ वाढली. यामुळे शहरातील प्रमुख चौक, रस्ते गजबजलेले राहिले.
लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे अत्यावश्यक सेवा आणि वस्तू विक्रीची दुकाने सकाळी ११ ऐवजी दुपारी चारपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा मिळाली. पावसाळा तोंडावर आला आहे. यामुळे पेरणीसाठी विविध प्रकारचे बियाणे आणि पावसापासून बचाव करण्यासाठी छत्री, रेनकोट, ताडपत्री असे साहित्य खरेदीसाठी लगबग दिसत होती. दुकानदारांनीही सोशल डिस्टन्स ठेवून साहित्य देण्याचे नियोजन केले आहे.
येथील लक्ष्मीपुरी, राजारामपुरी आदी ठिकाणी भाजीपाला, फळे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. लक्ष्मीपुरीतील धान्य, मिरची बाजारात पगारदार मंडळी पावसाळ्यासाठीचे धान्य खरेदी करताना दिसत होती.
चौकट
बस स्थानकातही...
एसटी महामंडळाने पन्नास टक्के प्रवासी क्षमतेसह बससेवा सुरू केली आहे. शहरांतर्गत विविध मार्गावर केएमटीही धावत आहेत. यामुळे दोन महिन्यांपासून थांबलेली बसची चाके धावू लागली आहेत. परिणामी बसस्थानकांत प्रवाशांची वर्दळ वाढल्याचे दिसत होते. सध्या प्रमुख मार्गावरीलच बससेवा सुरू असली तरी, प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. खासगी ट्रॅव्हल्सही सुरू झाल्या आहेत.
खेळ आणि मॉर्निंग वॉक
सकाळच्या टप्प्यात मैदाने सुरू झाली आहेत. यावर पहाटे मॉर्निंग वॉकर्स मोठ्या संख्येने व्यायामासाठी आले होते. काही मैदानात खेळही सुरू होते. शिवाजी विद्यापीठ रस्ता, रंकाळा परिसरात सकाळी फिरायला येणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. सलून, ब्युटीपार्लरच्या दुकानांतही वर्दळ वाढली होती.
शासकीय कार्यालयातही लोक
जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, करवीर तहसील, पंचायत समिती, महापालिकेतही विविध कामांसाठी अभ्यागत आले होते. जि. प.मध्ये सदस्य आणि त्यांचे समर्थक, कार्यकर्ते आल्याने परिसर गर्दीने फुलून गेला होता. राष्ट्रीयीकृत बँकांसमोरची गर्दी कायम राहिली. पेन्शनचे पैसे काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिक बँकेत आल्याचे दिसत होते.
रेडिमेड कपड्यांची दुकाने बंदच
नव्या नियमातही रेडिमेड कपडे, चप्पल, इलेक्ट्रॉनिक साहित्य, स्टेशनरीची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. परिणामी ही दुकाने बंदच राहिली. परिणामी संबंधीत दुकानदारांमध्ये घालमेल वाढली होती. पावसाळा सुरू होण्याआधीच दुकानातील साहित्य विकण्याचे त्यांचे नियोजन कोलमडून पडले आहे.