पंचगंगा महापुराच्या दिशेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2016 01:08 AM2016-07-13T01:08:19+5:302016-07-13T01:19:04+5:30
धोका पातळी ओलांडली : शंभरांवर गावांचा संपर्क तुटला; ७० बंधारे पाण्याखाली; एनडीआरएफला पाचारण
कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारीही धुवाधार पाऊस कायम राहिल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. विविध नद्यांवरील ७० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सुमारे शंभराहून अधिक गावांचा, तसेच तळकोकणाशी कोल्हापूरचा संपर्क तुटला आहे. पंचगंगा नदीने धोक्याची ४३ फुटांची जलपातळी ओलांडून महापुराच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाला (एनडीआरएफ) पाचारण करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडे पुराच्या पाण्याची तीव्रता अधिक असून, संततधारेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शाळा, महाविद्यालये, बॅँकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.
सलग चार दिवस जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असल्याने पुराच्या पाण्याने अनेक गावांना वेढा दिलेला आहे. पंचगंगा, भोगावती, कडवी, वेदगंगा, वारणा, दूधगंगा, आदी नद्यांवरील तब्बल ७० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. विशेषत: पश्चिमेकडील गगनबावडा, पन्हाळा, राधानगरी, करवीर तालुक्यांतील अनेक मार्ग बंद झाल्याने व या गावांचा संपर्क तुटल्याने शाळा, महाविद्यालये, बॅँकांचे कामकाज ठप्प राहिले; तर अनेक ठिकाणी पावसाचा जोर लक्षात घेऊन शाळा दुपारीच सोडण्यात आल्या.
कुडित्रे ते सांगरूळ मार्गावर कुंभी नदीचे पाणी आल्याने सांगरूळ परिसरातील वाहतूक ठप्प झाली आहे. कोल्हापूर ते गगनबावडा मार्गावर बालिंगे-दोनवडे दरम्यान, लोंघे, साळवण, मुटकेश्वर येथे पाणी आल्याने तळकोकणाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. त्यामुळे दूध, भाजीपाल्यासह अन्य वाहतूक ठप्प झाली आहे. त्याचबरोबर पुराच्या पाण्यामुळे अनेक गावांत वीजपुरवठा खंडित झाला आहे. काही ठिकाणी नावेतून वाहतूक सुरू आहे. धरणक्षेत्रांत धुवाधार कायम आहे. राधानगरी धरणक्षेत्रात चोवीस तासांत तब्बल २७०, तुळशी परिसरात ३४०, तर कुंभी धरणक्षेत्रात ३६० मिलिमीटर इतका उच्चांकी पाऊस झाल्याने पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. राधानगरी ६२ टक्के, वारणा ५३ टक्के, तर दूधगंगा धरण ३१ टक्के भरले आहे. जिल्ह्णातील लहान-मोठे बंधारे ओसंडून वाहत आहेत.
पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडल्याने सतर्कतेचा भाग म्हणून प्रशासनाने एनडीआरएफच्या (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) ४२ सैनिकांच्या तुकडीला पाचारण केले असून, त्याशिवाय ‘जीवनज्योती’चे १० जवान सज्ज आहेत.
प्रशासन सतर्क
पावसाचा जोर वाढल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून, त्यांनी विविध सामाजिक संस्था, सहकारी संस्थांकडे मदतीची मागणी केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘गोकुळ’ने दोन बसेस मदतीसाठी तैनात केल्या.
‘गोकुळ’च्या संकलनावर परिणाम
पुराच्या पाण्याने करवीर, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी तालुक्यांतील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्याचा परिणाम दूध वाहतुकीवर झाला असून ‘गोकुळ’चे दूध संकलन सुमारे वीस हजार लिटरनी कमी झाले आहे.
आपत्काळात नागरिकांनी येथे संपर्क साधावा -आपत्ती व्यवस्थापन विभाग, कोल्हापूर.
१०७७ (टोल फ्री), (०२३१) २६५९२३२, २६५२९५०, २६५२९५३, २६५२९५४.
काय आहे एनडीआरएफ ?
ओरीसामध्ये १९९९ ला चक्री वादळाचा तडाखा बसला. त्यानंतर २००१ ला गुजरातमध्ये मोठा भूकंप झाल्यानंतर अशा नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीचे निवारण करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर एकादे दल असायला हवे. असा विचार पुढे आला. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरण स्थापन करण्याची सूचना केली. या प्राधिकरणावर तज्ञ सदस्य म्हणून शरद पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्या चर्चेतून २६ डिसेंबर २००५ मध्ये हा कायदा अस्तित्वात आला . त्यातून नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (एन. डी. आर एफ) ची स्थापना झाली. या दलाचा भारतीय लष्कराशी तसा कोणताही थेट संबंध नाही. पॅरामिलीटरी कोर्स म्हणून ओळÞख असलेल्या केद्रीय राखीव दल किंवा सीमा सुरक्षा दल यातील जवानांमध्ये हा फोर्स आकाराला आला आहे. त्याचे नियंत्रण केंद्रीय गृहमंत्रालयाकडे आहे. परंतु या दलाचा वापर कुठे करायचा याचा निर्णय राज्यसरकार घेते. देशात नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती येणारे संभाव्य प्रदेश म्हणून यांची ओळख आहे. अशा दहा शहरात एनडीआरएफच्या बटालियन आहेत. महाराष्ट्रात पुणे व नागपूरला यांची बटालियन आहे. प्रशिक्षित जवानाशिवाय तंत्रज्ञ आणि वैद्यकीय मदत देण्याची क्षमता या बटालियनकडे आहे.
जुलैची सरासरी ओलांडली!
शिरोळ, पन्हाळा, शाहूवाडी, करवीर, कागल, गडहिंग्लज या तालुक्यांनी जुलै महिन्यातील पावसाची सरासरी ओलांडली आहे. १२ तारखेपर्यंतच जिल्ह्याने जुलै महिन्याची सरासरी ९१.५९ टक्के पूर्ण केली आहे.
बसेस अडकल्यापावसाचा जोर वाढल्याने पाणीपातळी त्याच पटीत वाढत गेली. प्रवासी घेऊन जाताना पाणी नव्हते; पण प्रवासी सोडून परत येईपर्यंत रस्त्यांवर पाणी आल्याने एस. टी. महामंडळाच्या बसेस अनेक ठिकाणी अडकून पडल्या आहेत.
२००५ ची पुनरावृत्ती शक्य
कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश धरणे अद्याप भरलेली नाहीत; तरीही शेतजमीन सततच्या पावसाने उगळल्याने पावसाचा थेंबन्थेंब वाहून नदीला येत असल्याने महापुराची स्थिती उद्भवली आहे. यापूर्वी २००५ मध्ये २६ जुलैला महापूर आला होता. त्याच दिवशी रंकाळाही ओसंडून वाहत होता.
पंचगंगा नदीची इशारा पातळी ३९ फूट, तर धोक्याची पातळी ४३ फूट आहे. मंगळवारी रात्री ११ वाजता पाण्याची पातळी ४४.१ फूट इतकी होती. धरणक्षेत्रात होत असलेला सगळा पाऊस धरणांत अडविला जात आहे; कारण धरणे अजून भरलेली नाहीत.
पावसाचा असाच तडाखा राहिला तर जिल्ह्यातील सगळी धरणे शनिवार (दि. १६) पर्यंत भरतील. त्यामुळे पाण्याची पातळी वाढणार
आहे. आॅगस्ट २००५ मध्ये पंचगंगेची पाणी पातळी ४५.११ फुटांपर्यंत गेली होती.