घरफाळा थकविल्याबद्दल टॉवर, पेट्रोल पंप सील, कोल्हापूर महापालिका प्रशासनाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 10:51 AM2019-03-14T10:51:10+5:302019-03-14T10:52:11+5:30
कोल्हापूर महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाची थकबाकी वसूल करण्याकरीता संबंधित मिळकतीवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले असून त्यानुसार मोठ्या थकबाकीदारांवर जप्ती व सील करण्याची कारवाई बुधवारपासून सुरू करण्यात आली. जप्तीनंतरही मिळकतधारकांनी थकबाकीची रक्कम भरली नाहीतर मिळकतीवर बोजा नोंद करण्यात येणार आहे.
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या घरफाळा विभागाची थकबाकी वसूल करण्याकरीता संबंधित मिळकतीवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले असून त्यानुसार मोठ्या थकबाकीदारांवर जप्ती व सील करण्याची कारवाई बुधवारपासून सुरू करण्यात आली. जप्तीनंतरही मिळकतधारकांनी थकबाकीची रक्कम भरली नाहीतर मिळकतीवर बोजा नोंद करण्यात येणार आहे.
बुधवारी गांधी मैदान विभागीय कार्यालयातर्फे ए वॉर्ड येथील रि.स.नं. २४०३ , वरुणतीर्थवेस निवृत्ती चौक येथील मारुती व पांडुरंग संतराम पाटील यांचे मिळकतीमध्ये असलेला जी.टी.एल. मोबाईल कंपनीचा टॉवर सील करण्यात आला. त्यांनी थकबाकीची रक्कम आठ लाख ६५ हजार ९४० रुपये भरलेले नाहीत. बी वॉर्ड सि.स.नं. २८७० / क ३ जवाहरनगर मेन रोडवरील इंडियन आॅईल कॉर्पो. लि.चा पेट्रोलपंपही सील करण्यात आला. त्यांनी थकबाकी रक्कम दोन लाख १६ हजार ०३८ रुपये भरलेले नव्हते.
तसेच ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयांतर्गत हॉटेल एलिगंट येथील जी. टी.एल. कंपनीचा टॉवर सात लाख ३३ हजार रुपये थकबाकी भरली नाही म्हणून सील करण्यात आला. या कारवाई अंतर्गत आज ताराबाई पार्क येथील स्टेट बँक आॅफ पटियाला यांच्याकडून ३० लाख ६३ हजार २६६ रुपये तर न्यू शाहूपुरी येथील स्टेट बँक आॅफ इंडिया या शाखेकडून चार लाख ५० हजार ९७० रुपये थकबाकीसह वसूल करण्यात आले.
ही कारवाई उपआयुक्त मंगेश शिंदे व कर निर्धारक संग्राहक दिवाकर कारंडे यांचे मार्गदर्शनाखाली कर अधीक्षक विशाल सुगते, अनिरुद्ध शेटे, सहायक अधीक्षक विजय वणकु द्रे, वसुली लिपीक भगवान मांजरे, सुभाष ढोबळे, राकेश भोसले, श्रीकांत चव्हाण, मुरलीधर बारापात्रे व कर्मचाऱ्यांनी केली.