नगराध्यक्षा, मुख्याधिकाऱ्यांना घेराव
By admin | Published: September 24, 2016 12:54 AM2016-09-24T00:54:48+5:302016-09-24T00:54:48+5:30
इचलकरंजी पालिकेत तणाव : घरकुलाची मागणी, मुख्याधिकाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा; आश्वासनानंतर उपोषण मागे
इचलकरंजी : जयभीम झोपडपट्टीवासीयांसाठी बांधण्यात आलेल्या इमारतीमधील घरकुलांचा ताबा मिळावा, या मागणीसाठी शुक्रवारी लाभार्थी आंदोलनकर्ते नगरपालिकेत घुसले. त्यांनी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे व मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांना घेराव घातला. मुख्याधिकाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणाबाजीमुळे वातावरण दणाणून सोडल्याने पालिकेत तणाव निर्माण झाला. दोन तासांच्या आंदोलनानंतर सर्व झोपडपट्टीवासीयांना घरकुले देण्यासाठी गुरुवारी (दि. २८) विशेष सभा घेण्यात येईल, अशी ग्वाही मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांनी दिल्यानंतर आंदोलन संपुष्टात आले.
जयभीम झोपडपट्टीवासीयांना केंद्र सरकारच्या योजनेतून घरकुले बांधून देण्यासाठी अपार्टमेंट पद्धतीच्या इमारती बांधण्याचे काम सुरू आहे. सध्या ६१२ घरकुलांच्या इमारती बांधून त्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत, तर १०८ घरकुलांसाठी इमारतीचे बांधकाम अद्याप सुरू केलेले नाही. आता अंतिम टप्प्यात आलेल्या इमारती पूर्ण करून त्याचा ताबा लाभार्थ्यांना द्यावा आणि उर्वरित १०८ घरकुलांच्या इमारतींचे बांधकाम सुरू करावे, या मागणीसाठी गेले चार दिवस नगरपालिकेसमोर लाभार्थ्यांच्यावतीने उपोषण सुरू आहे.
गुरुवारी झोपडपट्टीवासीयांबरोबर झालेल्या बैठकीत मक्तेदाराबरोबर शुक्रवारी बैठक घेऊन घरकुलांचा विषय निर्गत करण्यात येईल, असे मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांनी सांगितले होते. शुक्रवारी दुपारी साडेचार वाजेपर्यंत झोपडपट्टीवासीयांनी बैठकीची वाट पाहिली. मात्र, मुख्याधिकारी व मक्तेदार हे दोघेही नगरपालिकेकडे फिरकले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या सुमारे शंभरभर महिला-पुरुष लाभार्थी नगरपालिकेत शिरले. मुख्याधिकाऱ्यांच्या घोषणा देत त्यांनी नगराध्यक्षांचे दालन गाठले आणि नगराध्यक्षा बिरंजे यांना घेराव घातला.
लाभार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी उपमुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे आले; पण आंदोलनकर्त्यांनी मुख्याधिकारीच आले पाहिजेत, असा आग्रह धरला. संतप्त झालेल्या आंदोलनकर्त्यांचा पवित्रा पाहता नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्षा व उपमुख्याधिकारी यांच्याभोवती संरक्षक कडे केले. मात्र, महिला-पुरुषआंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून पालिकेतील वातावरण दणाणून सोडले.
तासाभराने मुख्याधिकारी डॉ. रसाळ पोलिस बंदोबस्तात दालनात आले. त्यावेळी सुद्धा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी दालनात पोलिस निरीक्षक सतीश पवार, सहायक पोलिस निरीक्षक युवराज खाडे हे पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी आले. तेथे आलेल्या नगरसेवक विठ्ठल चोपडे यांनी मध्यस्थी केली. दोन्ही बाजूंशी चर्चा करून तोडगा काढला. आंदोलकांच्या म्हणण्याप्रमाणे सर्वच लाभार्थ्यांना घरकुले देण्यासाठी गुरुवारी विशेष सभेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
२.३७ कोटी वर्गसाठी गुरुवारी सभा
सध्या अंतिम अवस्थेत असलेली ६१२ घरकुले आणि नव्याने बांधण्यात येणाऱ्या १०८ घरकुलांच्या इमारती बांधण्यासाठी ३.७७ कोटी रुपये लागणार आहेत. त्यापैकी १ कोटी ४० लाख रुपये नगरपालिकेला शासनाकडून प्राप्त झाले आहेत. त्यामधील १ कोटी ४ लाखांचा धनादेश मक्तेदाराला देऊन ६१२ घरकुलांचे अंतिम टप्प्यातील काम केले जाईल. तसेच उर्वरित २.३७ कोटी रुपये १४ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून वर्ग करण्यासाठी गुरुवारी विशेष सभा बोलावली जाईल. त्यामुळे जयभीम झोपडपट्टीवासीयांचा प्रश्न निर्गत होईल, अशी माहिती शुक्रवारच्या बैठकीच्या शेवटी नगरसेवक चोपडे यांनी सांगितली.