विषारी विदेशी तणाचा महाराष्ट्रात शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 04:59 AM2017-08-19T04:59:19+5:302017-08-19T04:59:19+5:30
विजयसिंह यादव महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या शेतात गाजरगवत, रानमोडी यांसारखे मानवी शरीरास व जनावरांना घातक असे ‘अॅम्बरोसिया अॅरटिमीसिफोलिया’ अर्थात ‘रॅगविड’ हे विदेशी, विषारी तण आढळून आले.
कोल्हापूर : पेठवडगाव येथील विजयसिंह यादव महाविद्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या शेतात गाजरगवत, रानमोडी यांसारखे मानवी शरीरास व जनावरांना घातक असे ‘अॅम्बरोसिया अॅरटिमीसिफोलिया’ अर्थात ‘रॅगविड’ हे विदेशी, विषारी तण आढळून आले. त्यामुळे या घातक वनस्पतींचा शिरकाव महाराष्ट्रात झाल्याचे स्पष्ट होत आहे, अशी माहिती ‘निसर्गमित्र’चे अध्यक्ष डॉ. मधुकर बाचूळकर व विजयसिंह यादव कॉलेजचे प्रा. दशरथ जगताप यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. बाचूळकर, जगताप म्हणाले, ही वनस्पती उत्तर अमेरिका येथील असून, ती युरोप खंडातील विविध देशांत प्रामुख्याने आढळते. ही वनस्पती दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आॅस्ट्रेलिया, न्यू झीलंड, जपान, तैवान, चीन व भारतातील सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नागालँड येथेही आढळते. याबाबत २०१५पासून अधिकचा अभ्यास करता या वनस्पतीचे नैसर्गिक पुनरुत्पादन व प्रसाराबाबत अभ्यासाच्या नोंदी करण्यात आल्या. त्यात ही सूर्यफुल वर्गातील वनस्पती आहे. हिची उंची ३० ते ९० सेंटिमीटरपर्यंत वाढते. या वनस्पतीला उग्र वास असून, फुले येण्यापूर्वी ही वनस्पती हुबेहूब गाजरगवतासारखी दिसते. या वनस्पतीचे एक रोप वर्षभरात तीन हजार बिया तयार करते. फळे काटेरी व बिया सुमारे ३९ वर्षांपर्यंत अबाधित राहू शकतात. त्यामुळे ही वनस्पती शेतमालाचे उत्पादन घटविते. हवेमार्फत या वनस्पतीचे पसरणारे परागकण माणसांच्या सान्निध्यात आल्यास नाक, घसा सुजतो. श्वसननलिकेस सूज येते. सर्दीचा त्रास होतो. डोळ्यांना खाज, डोळे सुजणे, लाल होणे, शरीरावर तांबडे पट्टे उठणे, त्वचेवर गाठी निर्माण होणे, दम्याचा त्रास सुरू होणे आदी प्रकार होतात. स्थलांतर करणाºया पक्ष्यांच्या विष्ठेतून या वनस्पतीचा प्रसार झाला.