जोतिबाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या शेतमजुरांची ट्रॅक्टर ट्रॉली उलटली; एक ठार, 20 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 08:36 PM2022-03-13T20:36:39+5:302022-03-13T20:37:56+5:30
ज्योतिबा डोंगरावर देवदर्शन घेऊन गावाकडे परतत असताना भाविकांची ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्यापासून पंधरा फूट खोल दरीत कोसळून दुर्घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ज्योतिबा डोंगरावर देवदर्शन घेऊन गावाकडे परतत असताना भाविकांची ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्यापासून पंधरा फूट खोल दरीत कोसळून दुर्घटना घडली. या अपघातात एक ठार तर 20 जण जखमी झाले. ही घटना सादळे मादळे नजीक कासारवाडी घाटात रविवारी सायंकाळी घडली. मृत व जखमी हेकोरेगाव (ता. वाळवा, जि.सांगली) येथील ऊसतोडणी कामगार आहेत. अशोक शंकर गावडे (वय 55) असे ठार झालेल्याचे नाव आहे. जखमींची नावे अशी, सुजल राजाराम भोसले (वय 10), रफिक बाबु बैल जमादार 52 महादेव साधू शिंदे (55), पोपट पाटील (45) लक्ष्मण बाळकृष्ण कापडे (40 सर्व राहणार कोरेगाव सांगली)
वारणा सहकारी साखर कारखाना येथे ऊस तोडणी हंगामाची रविवारी सांगता झाल्यानंतर हे सर्व ऊस तोडणी मजूरांचा फड दोन ट्राँलीतून ज्योतिबा डोंगरावर देवदर्शनासाठी गेले होते. सायंकाळी दोन ट्रॅक्टर ट्रॉलीतुन सुमारे 22 ते 25 तोडणी कामगार कोरेगाव (सांगली) कडे जात होते. त्या दरम्यान कोरेगाव घाटात ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर व दोन ट्राँली रस्ता सोडून सुमारे पंधरा फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात किमान वीस ते बावीस जण गंभीर जखमी झाले. तर एक जण जागीच ठार झाल्याची माहिती आहे. सर्व जखमींना सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच जखमींच्या नातेवाइकांनी सीपीआर रुग्णालयात धाव घेतली. सीपीआर रुग्णालयात जखमेवर उपचार करताना डॉक्टरांची तारांबळ उडाली.