‘जीएसटी’तील जाचक तरतुदींविरोधात उद्या जिल्ह्यातील व्यापार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:31 AM2021-02-25T04:31:44+5:302021-02-25T04:31:44+5:30
कोल्हापूर : वस्तू व सेवाकरातील (जीएसटी) जाचक आणि फूड सेफ्टी ॲक्टमधील अडचणीच्या तरतुदींविरोधात कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ...
कोल्हापूर : वस्तू व सेवाकरातील (जीएसटी) जाचक आणि फूड सेफ्टी ॲक्टमधील अडचणीच्या तरतुदींविरोधात कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ने उद्या, शुक्रवारी ‘भारत व्यापार बंद’ आणि ‘देशव्यापी चक्काजाम’ची हाक दिली आहे. त्याला प्रतिसाद देत कोल्हापूर जिल्ह्यातील ४० हजार व्यापारी या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. राज्यभर आणि अंतर्गत मालवाहतूक करणाऱ्या १५ हजार ट्रकची चाके थांबणार आहेत.
‘जीएसटी’मध्ये आतापर्यंत ९०० वेळा बदल झाले असून त्यामध्ये व्यापाऱ्यांचे हित जोपासलेले नाही. मात्र, जाचक अटी आणि तरतुदींमुळे व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या अटी, तरतुदींमध्ये सुधारणा करावी, या मागणीसाठी ‘कॅट’ने बंद आणि चक्का जाम पुकारला असून, त्याला व्यापारी, ट्रकचालकांनी पाठिंबा देऊन त्यामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचे ‘कॅट’चे उपाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी बुधवारी सांगितले. या बंदमध्ये कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजसमवेत संलग्न असलेल्या व्यापारी आणि व्यावसायिकांच्या विविध ३३ संघटनांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांतील बहुतांश संघटनांनी आतापर्यंत पाठिंबा जाहीर करून आपल्या सदस्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. बंददिवशी सकाळी ११ वाजता व्यापारी-व्यावसायिकांचे शिष्टमंडळ जीएसटी आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देणार असल्याचे ‘कोल्हापूर चेंबर’चे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले. जीएसटीतील जाचक तरतुदींचा मालवाहतूक क्षेत्रालाही फटका बसत आहे. त्यामुळे या बंदमध्ये जिल्ह्यातील १५ हजार ट्रकचालक आणि २०० ट्रान्सपोर्ट व्यावसायिक सहभागी होणार असल्याचे ऑल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्ट कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष जाधव यांनी सांगितले.
चौकट
राजारामपुरी व्यापारपेठ बंद राहणार
कॅट आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने केलेल्या आवाहनानुसार या बंदमध्ये राजारामपुरी व्यापारी असोसिएशनने सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार उद्या, शुक्रवारी राजारामपुरी व्यापार पेठ बंद राहणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.