महावितरण विरोधात व्यापारी आक्रमक
By admin | Published: June 12, 2015 11:59 PM2015-06-12T23:59:33+5:302015-06-13T00:16:19+5:30
सांगरूळ कार्यालयावर धडक : खंडित वीजपुरवठ्याबाबत अधिकाऱ्यांना विचारला जाब
कोपार्डे/सांगरूळ : सांगरूळ, खाटांगळे गावांत गेले अनेक दिवस वीजपुरवठा खंडित होत असल्याने सांगरूळ येथील व्यापारी असोसिएशनने महावितरणच्या कार्यालयावर धडक मारली. मात्र, या ठिकाणी कर्मचारी उपस्थित नसल्याने उपकार्यकारी अभियंता कार्यालयाशी संपर्क साधून टाळे ठोकण्याचा व निवेदन चिकटविण्याचा इशारा दिला. यानंतर धावाधाव करीत अधिकारी सांगरूळ येथे पोहोचले व निवेदन स्वीकारले.
यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संभाजी नाळे यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेऊन प्रश्नांची सरबत्ती केली. संभाजी नाळे यांनी उपकार्यकारी अभियंता यांच्यासमोर ग्रामस्थांची विजेबाबत व्यथा मांडली. ते म्हणाले, बोलोली सबस्टेशनकडून वीजपुरवठा सुरू झाल्यापासून सर्रास करून रात्री वीज गायब, तर दिवसा कधी कधी असते. सांगरूळ गाव हे बाजारपेठेचे गाव असल्याने येथे छोटे-मोठे उद्योग आहेत, तर दुर्गम भागातील बारा वाड्यांतील जनता पावसाळ्याआधी दळप-कांडप करून साठा करण्यासाठी येथे येत असत. मात्र, वीजच गायब असल्याने मोठ्या प्रमाणात असुविधा निर्माण होण्याबरोबर व्यापारावर विपरित परिणाम होत आहे.
याबाबत सांगरूळ येथील अधिकारी ए. के. नकाटे यांना वारंवार तोंडी व लेखी तक्रारी देऊनदेखील त्यांनी उपाययोजना केली नाही. येथील लाईनमन व वायरमन उडवाउडवीची उत्तरे देत फिडर ट्रीप झाल्याचे कारण सांगतात. मात्र, वारंवार घडणाऱ्या या प्रकारावर त्यांच्याकडून कोणताच उपाय झालेला नाही. बोलोली सबस्टेशनमधून वीजपुरवठा करण्याऐवजी कोगे येथून सुरू करा, असे सांगण्यात आले.
यावेळी गिरण मालक व घरगुती ग्राहकांनी येथील कर्मचारी शशिकांत पाटील यांच्याबाबत तक्रारींचा पाढा वाचला. वीज बिल भरले नसल्यास पाटील अरेरावीची भाषा करीत महिलांनाही उद्धट उत्तरे देत असल्याचे उपकार्यकारी अभियंता आर. एन. चव्हाण यांना सांगितले. यावेळी चव्हाण यांनी कनिष्ठ अभियंता ए. के. नकाटे यांना, आपण अधिकाऱ्यांप्रमाणे रहा व जनतेला सेवा द्या, असा सल्ला दिला. जर कोणी कर्मचारी कामात कुचराई करीत असेल, तर त्याचा अहवाल माझ्याकडे पाठवा, अशी सक्त सूचना केली.
यावेळी सोमवारी कर्मचाऱ्यांना बोलावून समज देऊ. यानंतरही कामात कुचराई केल्यास अशांवर कारवाई करू. तसेच वीजपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन आर. एन. चव्हाण यांनी व्यापारी असोसिएशनला दिले. यावेळी संभाजी नाळे, प्रकाश कांबळे, सुरेश गाताडे, मारुती राजे, विलास तेली, अनिल चव्हाण, महेश मेठे, मुरलीधर कासोटे, नेमनाथ सनाके, पंडित नाळे व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)