जिल्ह्यातील व्यापारी, व्यावसायिकांचा आज बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:36 AM2021-02-26T04:36:48+5:302021-02-26T04:36:48+5:30
कोल्हापूर : वस्तू व सेवाकरातील (जीएसटी) जाचक आणि फूड सेफ्टी ॲक्टमधील अडचणीच्या तरतुदींविरोधात आज (शुक्रवारी) कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापारी, व्यावसायिक ...
कोल्हापूर : वस्तू व सेवाकरातील (जीएसटी) जाचक आणि फूड सेफ्टी ॲक्टमधील अडचणीच्या तरतुदींविरोधात आज (शुक्रवारी) कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापारी, व्यावसायिक बंद पाळणार आहेत. मालवाहतूक ट्रक चालक-मालक चक्काजाम करणार आहेत.
कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)ने ‘भारत व्यापार बंद’ आणि ‘देशव्यापी चक्काजाम’ची घोषणा केली आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील ४० हजार व्यापारी, व्यावसायिक आणि राज्यभर आणि अंतर्गत मालवाहतूक करणाऱ्या १५ हजार ट्रकचे चालक-मालक सहभागी होणार आहेत. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजशी संलग्नित असलेल्या विविध ३३ संघटना आणि त्यांचे सदस्य या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. जीएसटीतील जाचक अटी, फूड सेफ्टी ॲक्टमधील अडचणीच्या तरतुदी रद्द कराव्यात, या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी बंदच्या दिवशी आम्ही दुचाकी रॅली काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने परवानगी मिळाली नाही. त्यामुळे ही रॅली काढण्यात येणार नाही. व्यापारी, व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी, केंद्र आणि राज्य जीएसटीच्या कोल्हापूर विभागाचे आयुक्त, लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात येणार असल्याचे ‘कोल्हापूर चेंबर’चे अध्यक्ष संजय शेटे यांनी गुरूवारी सांगितले.
चौकट
‘महाराष्ट्र चेंबर’चा सहभाग
या बंदमध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज सहभागी होणार आहे. अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखालील गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत त्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील विविध ठिकाणी दोन तासांचे धरणे आंदोलन केले जाणार आहे. जीएसटी आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे ‘महाराष्ट्र चेंबर’चे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.