शाहुपुरी, लक्ष्मीपुरीतील व्यापारी, व्यावसायिकांची तारांबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:15 AM2021-07-24T04:15:47+5:302021-07-24T04:15:47+5:30
कोल्हापूर : जोरदार पावसामुळे आलेल्या महापुराचे पाणी दुकानांमध्ये शिरल्याने शुक्रवारी शहरातील शाहुपुरी, लक्ष्मीपुरी, स्टेशनरोड, व्हिनस कॉर्नर परिसरातील व्यापारी, व्यावसायिकांची ...
कोल्हापूर : जोरदार पावसामुळे आलेल्या महापुराचे पाणी दुकानांमध्ये शिरल्याने शुक्रवारी शहरातील शाहुपुरी, लक्ष्मीपुरी, स्टेशनरोड, व्हिनस कॉर्नर परिसरातील व्यापारी, व्यावसायिकांची तारांबळ उडाली. पाण्यामुळे दुकानांतील साहित्याचे नुकसान टाळण्यासाठी ते सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी त्यांची धावपळ सुरू होती. सलग तिसऱ्या दिवशी कोल्हापूरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शहरातील जयंती नाला ओसंडून वाहू लागला. त्याचे पाणी व्यापारीपेठ असणाऱ्या शाहुपुरीतील पहिली ते सहावी गल्ली, लक्ष्मीपुरीतील कोंडाओळ, व्हिनस कॉर्नर, स्टेशन रोड, शुक्रवार पेठ, उत्तरेश्वर पेठ परिसरामध्ये शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून पाणी शिरले. तासगाणिक त्यामध्ये वाढ होऊ लागली. या परिसरात औषधे, किराणा, शेती अवजारे, कोंडा, टायर्स, डिजिटल प्रिटिंग, चांदी कारागीर आदींची दुकाने आहेत. सखल ठिकाणी असलेल्या दुकानांमध्ये वेगाने पाणी शिरले. त्यातील काहींना दुकानांपर्यंत पोहोचता आले नाही. दुकानांपर्यंत जाणे शक्य असलेल्या व्यापारी, व्यावसायिकांनी त्यांच्या कुटुंबीय, कामगारांच्या मदतीने साहित्य सुरक्षित ठिकाणी नेले. काहींना कमरेइतक्या पाण्यातून वाट काढत साहित्य तेथून बाहेर काढले. कोसळणारा पाणी आणि महापुराच्या वाढणाऱ्या पाण्यात जीव मुठीत घेऊन त्यांचे साहित्य स्थलांतरित करण्याचे काम सुरू होते. साहित्य स्थलांतरित केल्यानंतर त्यांनी दुकाने बंद केली. दुपारी चारपर्यंत बहुतांश त्यांचे काम सुरू होते.
चौकट
‘कोल्हापूर चेंबर’कडून दक्षतेचे आवाहन
शहरात महापुराचे पाणी वाढू लागल्याचे निर्दशनास आल्यानंतर कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्यावतीने गुरुवारी सायंकाळपासून शाहुपुरी, लक्ष्मीपुरीसह पुराचे पाणी येणाऱ्या परिसरातील व्यापारी, व्यावसायिकांना त्यांच्या दुकानांमधील साहित्य सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यास सांगितले. पावसाबरोबरच पुराचे पाणी वाढत असल्याने व्यापारी, व्यावसायिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन ‘कोल्हापूर चेंबर’चे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले. पुरामुळे शहरात स्थलांतरित झालेल्या आंबेवाडी, प्रयाग चिखली आदी परिसरातील नागरिकांना जेवण पुरविण्यासाठी हॉटेल मालक संघाला आवश्यक ती मदत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चौकट
पुन्हा फटका
कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे गेल्या तीन महिन्यांपासून शहरातील व्यापार, व्यवसाय बंद राहिला. गेल्या आठवड्यापासून सर्व व्यापार सुरू झाला आहे. त्यातच आता महापूर आल्याने व्यापारी, व्यावसायिकांना पुन्हा फटका बसला आहे.