अंबाबाईची परंपरा जपली जावी
By admin | Published: June 13, 2017 01:02 AM2017-06-13T01:02:14+5:302017-06-13T01:02:14+5:30
पेहरावसंबंधी वाद : विविध व्यक्ती संस्थांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाईला करण्यात आलेल्या घागरा-चोलीच्या पेहरावविरोधात विविध व्यक्ती व संस्थांनी सोमवारी जिल्हाधिकारी तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष अविनाश सुभेदार यांना निवेदन दिले.
पुजारीमुक्त मंदिर व्हावे : शरद तांबट
श्री अंबाबाई मूर्तीचे अपुरे संवर्धन, मंदिरातील दुरवस्था आणि श्रीपूजकांचे गैरवर्तन याबाबत देवस्थानने आवाज उठवून आठवडा झाला नाही तोपर्यंत पुजाऱ्यांनी देवीला घागरा-चोलीचा पेहराव करून भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. तरी शासनाने हे मंदिर श्रीपूजकमुक्त करून सर्वसमावेशक पुजारी नेमावेत, अशा आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते शरद तांबट यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे की, एखाद्या भक्ताने लाख रुपये देऊन आपल्या नामांच्या वस्त्रांची जाहिरात करायला सांगितली तर श्रीपूजक त्या पद्धतीने पूजा करतील. शासनानेच अंबाबाईची ही अवहेलना थांबवावी. भाविकांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता या श्रीपूजकांची हकालपट्टी करून त्याजागी शिर्डी व पंढरपूरच्या धर्तीवर सर्वसमावेशक पुजारी मंडळ ताबडतोब नेमण्यात यावे.
अंबाबाईच्या पूजेची संस्कृती जपावी : सुरेश साळोखे
गेली हजारो वर्षे श्री अंबाबाई देवीची पारंपरिक पद्धतीने होणारी पूजा व परंपरेला फाटा देत श्रीपूजकांनी चोली-घागरा पेहराव करून भाविकांच्या भावना दुखावल्या आहेत. याप्रश्नी समन्वय समिती स्थापन करून वाद मिटवून अंबाबाईची संस्कृती जपावी, अशी मागणी माजी आमदार सुरेश साळोखे यांनी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे की, साडी-चोळी हा श्री अंबाबाईचा पारंपरिक पेहराव असतानाही पैशाच्या आमिषापोटी भक्तांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला आहे. श्रीपूजकांच्या चुकीच्या कृत्यामुळे मंदिराचे व्यापारीकरण चालले आहे. हे मंदिर कोणाची तरी मक्तेदारी होत आहे. पूजेच्या नावाखाली खेळखंडोबा होऊन देवीचे पावित्र्य नष्ट होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली देवस्थान समितीचे दोन सदस्य, श्रीपूजकांचेदोन सदस्य, जिल्हा पोलीसप्रमुख, नागरिकांमधील दोन सदस्य अशी दहा जणांची समन्वय समिती स्थापन करून संवादाने हा वाद मिटवावा, अशी मागणी साळोखे यांनी केली.
यावेळी शिवसेना माजी शहरप्रमुख दिलीप पाटील, दीपक मगदूम, सुरेश पाटील, अनिल साळोखे, दिलीप जाधव, दिलीप देसाई, युवराज खंडागळे, राजू मोहिते, मुबारक शेख, प्रसाद कुलकर्णी, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
अंबाबाईची संस्कृती जपावी, या मागणीचे निवेदन माजी आमदार सुरेश साळोखे यांनी सोमवारी जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना दिले.