लाईन बझारची इन्फंट्रीच्या त्र्यंबोली यात्रेची परंपरा

By admin | Published: July 26, 2016 12:32 AM2016-07-26T00:32:05+5:302016-07-26T00:37:16+5:30

पी-ढबाकचा गजर : संस्थानकालीन राजाराम रायफल्सने १८६८ मध्ये अर्पण केले मुखवटे

Tradition of the Trimboli Yatra of the Line Bazaar's Infantry | लाईन बझारची इन्फंट्रीच्या त्र्यंबोली यात्रेची परंपरा

लाईन बझारची इन्फंट्रीच्या त्र्यंबोली यात्रेची परंपरा

Next

इंदुमती गणेश -- कोल्हापूर --राजाराम महाराज यांच्या काळातील इन्फंट्रीमधील सैनिकांकडून केल्या जाणाऱ्या त्र्यंबोली यात्रेची परंपरा अद्यापही लाईन बझारने जपली आहे. ‘कोल्हापूरचे रक्षण करणारी देवता’ म्हणून त्र्यंबोली व मरगाई देवीला राजाराम रायफल्सकडून सन १८६८ मध्ये मुखवटे अर्पण करण्यात आले. डॉल्बीच्या जमान्यात त्र्यंबोली यात्रेचे स्वरूप बदलले असले तरी येथून मात्र ‘पी ढबाक्’च्या गजरात पालखी त्र्यंबोलीला जाते.
ब्रिटिशांनी सन १८४५-४८ च्या दरम्यान आताच्या लाईन बझार येथील स्थानिकांकडून भूखंड घेऊन रेसिडेन्सी स्थापन केली. याच्या संरक्षणासाठी इन्फंट्री सुरू करण्यात आली त्यात ८०० हून अधिक स्थानिकांची भरती करण्यात आली. ‘रक्षणकर्ती देवता’ म्हणून इन्फंट्रीमधील सैनिकांनी सन १८६८ मध्ये त्र्यंबोली व मरगाई देवीला चांदीचे मुखवटे, मासपट्टा, चपला अर्पण केल्या. त्यातील मुखवट्यांवर राजाराम रायफल्स कोल्हापूर यांच्याकडून ‘अर्पण शके १८६८ भार ७५’ असे नमूद आहे.
शहाजी महाराजांच्या काळात इन्फंट्रीचे ‘शहाजी नगर’ असे नामांतर झाले. येथील वसाहती एका ओळीत होत्या. येथेच बाजारही भरायचा त्यामुळे या भागाला आता ‘लाईन बझार’ म्हणून ओळखले जाते. या लाईन बझारची त्र्यंबोली यात्रा आज, मंगळवारी होणार आहे. आजही हिंदू समाजातर्फे लाईन बझार या परिसरासाठी सरपंचांची निवड केली जाते. येथील मैदानावर होणाऱ्या सीमोल्लंघन सोहळ््याचा पहिला मान या सरपंचांना आहे.


संस्थानकालीन वास्तूंचा परिसर
या परिसरात संस्थानकालीन वास्तू आहे. लक्ष्मी-विलास पॅलेस, रिसाला म्हणजे आताचे एसआरपी कॅम्प, भगवा चौकातील पोलिसांची शाळा, ब्रिटिशकालीन रेसिडेन्सियल निवास म्हणजे सध्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निवासस्थान. इन्फंट्री पोलिसांचे निवासस्थान म्हणजे पोलीस मुख्यालय, कवायत मैदान म्हणजे महासैनिक दरबार, इंदुमती राणी सरकारांचा वाडा म्हणजे सर्किट हाऊस, घोड्याच्या पागा व राऊंडाचा माळ म्हणजे शेती फार्म कार्यालय.


देवीचा कौल
त्र्यंबोली यात्रा करण्यासाठी आजही येथील नागरिकांकडून देवीचा कौल घेतला जातो. त्यासाठी आषाढ महिन्याच्या पंधरा दिवस आधी लाईन बझार येथील जुनी जाणती मंडळी त्र्यंबोलीला जातात.


घरटी एक आणा...
देवस्थान समितीच्या कागदपत्रात त्र्यंबोली यात्रा राजाराम रायफल्समधील सैनिकांनी करावी. त्यासाठीचा खर्च कवट्याचं रान व मारुती देवालयामागील जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून करावा, असे नमूद आहे नंतर इन्फंट्रीच्या पगारातून रक्कम वजा केली जायची. पुढे घरटी मासिक एक आणा वर्गणी गोळा केली जायची. या सगळ््या हिंदू समाजाच्या सन १९६८-७१ या काळातील नोंदी आहेत.

Web Title: Tradition of the Trimboli Yatra of the Line Bazaar's Infantry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.