पारंपरिक बाज; आधुनिकतेचा साज
By admin | Published: February 20, 2016 12:18 AM2016-02-20T00:18:55+5:302016-02-20T00:43:27+5:30
शिवजयंती मिरवणूक : ढोल-ताशांसह एलईडी लाईटस्चा मिरवणुकीत वापर : देखावे, उंट, घोड्यांनी वाढविली शान
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळातर्फे प्रतिवर्षी साजऱ्या केल्या जाणाऱ्या शिवजयंतीचा ऐतिहासिक व पारंपरिक बाज यंदा बदलला. पारंपरिक वाद्यांसोबतच एलईडी लाईटस्, एलईडी वॉल, रंगमंचावर सादर केलेल्या सजीव देखाव्यांनी शुक्रवारी निघालेल्या मिरवणुकीची भव्यता वाढविली तर उंट, घोडे, मर्दानी खेळ, हलगीचा कडकडाट आणि बैलगाड्यांच्या फौजफाट्यानी परंपराही जोपासली. तरुणांसह महिलाही मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.
शिवाजी पेठेच्या शिवजयंतीला एक सुवर्णमहोत्सवी परंपरा आहे. सर्व पक्ष, सर्व संघटना, सर्व विचारांचे कार्यकर्ते या शिवजयंती सोहळ्यात सहभागी होत असतात. बैलगाड्यांवर उभारले जाणारे प्रबोधनपर फलक, झांज, हलगी, लेझीम, ताशांच्या गजरात आणि मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके ही तर शिवाजी तरुण मंडळाच्या मिरवणुकीची खासियतच आहे; परंतु यंदा या पारंपरिक वाद्यांबरोबरच डॉल्बी, एलईडी लाईटस्, एलईडी वॉल आदींचे आधुनिक स्वरूपही यंदाच्या मिरवणुकीत पाहायला मिळाले.
शुक्रवारी सकाळी १० वाजून १० मिनिटांनी उभा मारुती चौकात उभारलेल्या भव्य रंगमंचावर शिवजन्मकाळ सोहळा साजरा झाला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ चव्हाण यांच्यासह डॉ. सोपान राणे, भीमराव साळोखे, भिकाजी इंगवले, बबनराव कोराणे आदी उपस्थित होते. जन्मकाळ झाल्यानंतर आतषबाजी करण्यात आली व सुंठवडा वाटप करण्यात आला.
सायंकाळी सहा वाजता उभा मारुती चौक येथे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी शिवमूर्तीची पूजा केली. त्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला. यावेळी महापौर अश्विनी रामाणे, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, उपअधीक्षक भारतकुमार राणे, रामभाऊ चव्हाण, माजी महापौर आर. के. पोवार, बाजीराव चव्हाण, अॅड. धनंजय पठाडे, चंद्रकांत यादव, अशोकराव साळोखे, महेश जाधव, सुरेश जरग, लाला गायकवाड, निवासराव साळोखे, बाबा पार्टे, अरुणराव साळोखे, अजित राऊत, सचिन चव्हाण, सुरेश गायकवाड, रविकिरण इंगवले आदी मान्यवर उपस्थित होते. माजी मंत्री सतेज पाटील यांनीही या मिरवणुकीत थोडा वेळ हजेरी लावली.
उंट, घोड्यांनी शान वाढविली
मिरवणुकीत अग्रभागी उंट, घोडी होती. त्यावर बालशिवाजीची वेशभूषा केलेली मुले बसली होती. पाठोपाठ हरिद्वार येथील बॅँडपथक होते. या पथकाने अतिशय सुंदर स्वरात देशभक्तिपर गीते सादर करून लक्ष वेधून घेतले. मिरवणुकीत मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करणारी तीन पथके होती. हातात लाठीकाठी, तलवार, भाले घेऊन तरुणांनी शहारे निर्माण केले.
एलईडी लाईटस्चा इफेक्ट
यंदा मिरणुकीत एलईडी लाईट व एलईडी वॉल तसेच डॉल्बी आणला होता, त्यामुळेच प्रतिवर्षी दुपारी साडेचार वाजता निघणारी मिरवणूक सायंकाळी सहा वाजता सुरू झाली. अंधरा पडला तशी या लाईटस्नी मिरवणुकीला आधुनिकतेचा झालर जोडली. या लाईटस्नी मिरवणूक मार्गावरील आसमंत भेदला. एलईडी वॉलवर शिवछत्रपतींच्या जीवनावरील प्रसंग सादर करण्यात येत होते.
रंगमंचावर सजीव देखावा
मिरवणुकीतील एका वाहनावर रंगमंच उभारण्यात आला होता. या रंगमंचावर अफझल खानाचा वध यासह अन्य प्रसंग सादर करण्यात येत होते. आकर्षक लाईट, उत्तम नेपथ्य आणि वेशभूषेमुळे शिवकाळातील काही प्रसंग रंगमंचावर जिवंत झाले.
प्रबोधनात्मक फलकांचा जागर
प्रबोधनपर फलक लावलेल्या बैलगाड्यांची संख्या यंदा थोडी कमी असली तरी ‘स्त्री भ्रूणहत्या थांबवा’, ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’, ‘बुवाबाजी कुडमुडे जोशी’, ‘मराठा आरक्षण’, ‘निसर्ग कोपला, पाऊस लांबला’, ‘मावा-गुटखा-पिचकारी वीर’, ‘या सावकारांना कधी सोलून काढणार’, ‘महिलांची छेडछाड’ आदी विषयांवर प्रबोधनपर फलकांचा समावेश होता. ‘आंबे’वाले स्वयंघोषित आंदोलनकर्त्यांचा एक फलकही सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
उत्स्फूर्त सहभाग
या मिरवणुकीत शिवाजी पेठेतील विविध तालीम मंडळे, संस्थांचे कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते तसेच तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.
‘शिवाजी-मुस्लिम ब्रिगेड’ची मिरवणूक
कोल्हापूर : नेत्रदीपक करबला मेल नृत्य, मुस्लिमांसह बहुजन समाजातील मुलांनी साकारलेले बालशिवाजी, जिजाऊ व ‘जय शिवाजी-जय भवानी’च्या जयघोषात छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडने काढलेल्या मिरवणुकीने कोल्हापूरवासीयांचे लक्ष वेधले. मिरवणुकीत सर्वच क्षेत्रांतील आबालवृद्ध सहभागी झाले होते.
छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड, हुतात्मा पार्क चौक गेली चार वर्षे शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी करतात. यंदा यळगूड येथील करबला मेल हे नृत्य मिरवणुकीत आणले होते. पायात काही न घालता मुस्लिम समाजातील तरुणांनी केलेल्या नृत्य सादरीकरणाने सर्वांना ठेका धरावयास लावला. छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ व मावळ्यांची वेशभूषा परिधान करून घोड्यावर बसलेले बालचमू मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले.
सायंकाळी साडेसहा वाजता आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हुतात्मा पार्क चौकातून मिरवणुकीस सुरुवात झाली.
यावेळी महिला आणि बालकल्याण सभापती वृषाली कदम, नगरसेवक नियाज खान, भूपाल शेटे, माजी उपमहापौर परिक्षीत पन्हाळकर, आदिल फर
ास, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे, रहिम सनदी, किसन कल्याणकर, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष साजेद खान, कादर मलबारी, फिरोज खान उस्ताद, ऐयाज बागवान, ऐयाज मुजावर, बाबासाहेब मुल्ला आदी सहभागी झाले होते. टेंबे रोड, बिंदू चौकामार्गे शिवाजी पुतळा येथे मिरवणुकीची सांगता झाली.