पारंपरिक थाटात शाही दसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 12:58 AM2017-10-02T00:58:43+5:302017-10-02T00:58:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : तोफेच्या सलामीनंतर सुवर्णपालखीत विराजमान झालेली कोल्हापूरची करवीरनिवासिनी श्री अंबाबाई, जुना राजवाड्यातील तुळजाभवानी, छत्रपती शिवरायांची मूर्ती आणि गुरुमहाराजांच्या पालख्या, पोलीस बँड, पारंपरिक वाद्यांचा गजर, बंदुकीच्या फैरी झाडून दिलेली मानवंदना, शाहू छत्रपतींच्या हस्ते शमीपूजन आणि दुर्गेची आरती सुरू असतानाच सुरू झालेल्या पावसाच्या साक्षीने शनिवारी कोल्हापुरातील शाही दसरा सोहळा साजरा झाला. ‘सोनं घ्या, सोन्यासारखं राहा’ म्हणत कोल्हापूरकरांनी दसºयाचा आनंद लुटला.
कोल्हापूरची करवीरनिवासिनी श्री अंबाबाई, तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रौत्सवाची सांगता विजयादशमीला सीमोल्लंघनाने झाली. कोल्हापूर संस्थानाचा अनोखा पारंपरिक शाही सीमोल्लंघन सोहळा ऐतिहासिक दसरा चौकात रंगला.
विजयोत्सव साजरा करण्यासाठी भालदार-चोपदार, घोडेस्वार अशा शाही लव्याजम्यानिशी आलेली करवीरनिवासिनी अंबाबाई, तुळजाभवानीच्या उत्सवमूर्ती, कोल्हापूर संस्थानचे शाहू छत्रपती, खासदार संभाजीराजे, माजी आमदार मालोजीराजे, शहाजीराजे, यशस्विनीराजे, यशराजराजे यांच्या हस्ते शमीपूजन झाले.
यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, अंजली पाटील, महापौर हसिना फरास, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, खासदार धनंजय महाडिक, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, संजय डी. पाटील, पोलीस अधीक्षक संजय मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्य शिवाजीराव जाधव, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, तसेच सरदार घराण्याचे मानकरी यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.
म्हैसूर-ग्वाल्हेरनंतर कोल्हापूरचा शाही दसरा सोहळा प्रसिद्ध आहे. सायंकाळी पाच वाजता तोफेच्या सलामीनंतर अंबाबाई, तुळजाभवानीदेवी व गुरुमहाराज यांच्या पालख्या आपल्या लवाजम्यानिशी दसरा चौकाकडे प्रस्थान झाल्या. दरम्यान, शाहू छत्रपतींचेही ‘मेबॅक’ गाडीतून सोहळास्थळी आगमन झाले. येथे पोलीस बँडने देवीला मानवंदना दिली. शाहू महाराजांच्या हस्ते देवीची आरती सुरू झाली आणि जोरदार सरींनी पावसाला सुरुवात झाली. या पावसात शाहू छत्रपतींनी देवीची आरती व शमीपूजन केले. त्यानंतर बंदुकीच्या फैरी झाडून या शाही सोहळ्याला सलामी देण्यात आली. त्यानंतर नागरिकांनी सोने लुटले. त्यानंतरही पाऊस सुरूच राहिला. अंबाबाईची पालखी आपल्या लवाजम्यानिशी सिद्धार्थनगर, पंचगंगा नदीघाट, गंगावेश, पापाची तिकटी, गुजरीमार्गे रात्री मंदिरात परतली.
अंबाबाईची रथातील पूजा
आठ दिवस महिषासुराशी घनघोर युद्ध करून विजय मिळविलेल्या दुर्गेच्या विजयोत्सवाचा क्षण म्हणजे सीमोल्लंघन सोहळा. यानिमित्त करवीरनिवासिनी अंबाबाईची रथारूढ पूजा बांधण्यात आली.