वाहतूक नियंत्रण आराखडा करा

By admin | Published: May 10, 2017 01:04 AM2017-05-10T01:04:05+5:302017-05-10T01:04:05+5:30

पालकमंत्र्यांच्या सूचना : कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना करणार

Traffic control should be outlined | वाहतूक नियंत्रण आराखडा करा

वाहतूक नियंत्रण आराखडा करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : कोल्हापूर शहरामध्ये वाहतुकीची कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शहराचा एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करा, अशा सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केल्या. यासाठी अप्पर पोलीस अधीक्षकांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सुचविले.
पोलीस अधीक्षक कार्यालयात वाहतूक नियोजन आढावा बैठक मंगळवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी पोलीस अधीक्षक संजय मोहिते, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, अप्पर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, ‘केएसबीपी’चे अध्यक्ष सुजय पित्रे, शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे, वाहतूक पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत हे प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, नागपूरच्या धर्र्तीवर कोल्हापूरच्याही शहर वाहतुकीचेही नियमन होणे आवश्यक होते. कोंडी होणाऱ्या १९ ठिकाणांवर तत्काळ उपाययोजना करू तसेच सिग्नल सिंक्रोनायझेशनसाठी महानगरपलिकेकरिता २३ लाख रुपयांचा प्रस्ताव पाठविल्याचे त्यांनी सांगीतले.

७० लाख मंजूर
झेब्रा क्रॉसिंग आणि ट्रॅफिक सायनेजेस यांच्यासाठी ७० लाख रुपयांचा प्रस्ताव महानगरपालिकेने मंजूर केला असून, त्यापैकी २० लाख रुपयांचे झेब्रा क्रॉसिंग व स्पीडब्रेकरचे काम १२ ठिकाणी केले आहे; तर १३ चौकांमध्ये काम अद्याप बाकी आहे. जिल्ह्यातील व शहरातील वाहतूक पोलिसांसाठी ट्रॅफिक चलन मोबाईल अ‍ॅप आणि डिव्हाईस खरेदी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून ६१ लाख रुपयांचा प्रस्ताव सादर केल्याचेही सांगण्यात आले.


६१४६ वाहनधारकांना
दोन लाख रुपये दंड
शहरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, आतापर्यंत ६१४६ वाहनधारकांना नोटिसा काढल्या आहेत. त्यांच्याकडून १ लाख ९० हजारांचा दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.


ट्रॅफिक पोलीस अ‍ॅप
‘कोल्हापूर ट्रॅफिक पोलीस’ नावाने तयार केलेल्या मोबाईल अ‍ॅपबद्दल माहिती देण्यात आली. यामध्ये संदेश देणे, वाहतुकीचे नियम मोडणारी वाहने उचलली असल्यास त्याबद्दलची माहिती तसेच कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नोंदणीकृत सर्व गाड्यांची माहिती यांचा अंतर्भाव असून, हे अ‍ॅप अत्यंत उपयुक्त असल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी अभिनंदन केले. वडगाव, एमआयडीसी शिरोली, गोकुळ शिरगाव, गांधीनगर व कागल हद्दीतून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक ४ वर एक अधिकारी व १५ कर्मचारी बिट पेट्रोलिंग व फिक्स पॉइंटकरिता नेमले आहेत. बँक आॅफ इंडियातर्फे वाहतूक पोलिसांच्या मदतीकरिता १०० पॉस युनिट देण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.


दहा ठिकाणी रस्ता दुभाजक
शहरात २५ सिग्नलपैकी ११ सिग्नल बंद अवस्थेत आहेत तसेच क्रशर चौक, हॉकी स्टेडियम चौक, सायबर चौक, टाकाळा चौक, सीपीआर, गोखले कॉलेज, गंगावेश, व्हीनस कॉर्नर, रंकाळा रोड, डीमार्टसमोर, आदी चौकांमध्ये रस्ता दुभाजक टाकण्याची आवश्यकता आहे.

Web Title: Traffic control should be outlined

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.