दानवाड दुधगंगा पुलावरील वाहतूक धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:24 AM2021-04-20T04:24:29+5:302021-04-20T04:24:29+5:30
दत्तवाड : महाराष्ट्र-कर्नाटक या दोन राज्यांना जोडणाऱ्या जुने दानवाड (ता. शिरोळ) येथील दुधगंगा नदीवरील पुलावर मध्यभागी खड्डा पडला असून, ...
दत्तवाड : महाराष्ट्र-कर्नाटक या दोन राज्यांना जोडणाऱ्या जुने दानवाड (ता. शिरोळ) येथील दुधगंगा नदीवरील पुलावर मध्यभागी खड्डा पडला असून, आतील सळ्या बाहेर आल्याने वाहनधारकांना कसरत करतच वाहन चालवावे लागत आहे. तर संरक्षक कठडा तुटल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जुने दानवाड (ता. शिरोळ) येथील दुधगंगा नदीवरील पूल हा शिरवत-चिक्कोडी कर्नाटक यांना जोडणारा मुख्य पूल आहे. या पुलावरून नृसिंहवाडी, जयसिंगपूर याठिकाणी येणाऱ्या कर्नाटकातील भाविकांची संख्या जास्त आहे; तर कर्नाटकातील चिक्कोडी, संकेश्वर, बेळगाव याबरोबर रायबाग या भागात जाणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांची संख्यादेखील मोठी आहे. सीमाभागातील शिरोळला जोडणारा हा मुख्य पूल आहे. या पुलाच्या मध्यभागी खड्डा पडला आहे. या खड्डयातून पुलाच्या आतील स्लॅबमध्ये असणाऱ्या सळ्या बाहेर आल्या आहेत. यामुळे हा खड्डा चुकवून बाजूला गाडी घेतली, तरी बाजूच्या संरक्षक कठडादेखील तुटला आहे. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून, हा खड्डा त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
फोटो - १९०४२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - दुधगंगा नदीवरील पुलावर पडलेला खड्डा व तुटलेला संरक्षक कठडा. (छाया - सुकुमार पाटील, जुने दानवाड)