वाहतुकीची कोंडी, अस्वच्छतेचा प्रश्न--‘लोकमत आपल्या दारी
By admin | Published: March 31, 2015 11:54 PM2015-03-31T23:54:23+5:302015-03-31T23:59:37+5:30
महाराणा प्रताप चौकातील समस्या : परिसरात व्यायामशाळा, सांस्कृतिक हॉल, मैदानाचा अभाव
इंदुमती गणेश / प्रदीप शिंदे -कोल्हापूर
कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती परिसरात असलेल्या महाराणा प्रताप चौकात के.एम.टी.- अॅपेरिक्षा थांबा यामुळे वाहतुकीच्या कोंडीची गंभीर समस्या आहे. याशिवाय रस्त्यांवरचे बंद दिवे, सार्वजनिक स्वच्छतागृहांचा अभाव, तुंबलेल्या गटारी, कचरा उठावात अनियमितता, कमी दाबाने पाणीपुरवठा अशा अनेक प्रश्नांनी आम्ही त्रस्त असल्याची भावना नागरिकांनी ‘लोकमत’पुढे मांडली. ‘लोकमत आपल्या दारी’ या मोहिमेअंतर्गत मंगळवारी ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी महाराणा प्रताप चौक व आसपासच्या परिसरातील समस्या जाणून घेतल्या. यावेळी नागरिकांनी मनमोकळेपणाने आपले प्रश्न मांडले.
महाराणा प्रताप चौक हा परिसरच मुख्य रहदारीचा आहे. येथेच केएमटी थांबा, अॅपेरिक्षा थांबा असल्यामुळे सकाळ-संध्याकाळ येथे वाहतुकीची कोंडी होते. चौकातच महापालिकेची झाकीर हुसेन उर्दू शाळा आहे; पण रहदारीमुळे विद्यार्थ्यांनाच काय घरातील लहान मुलांनाही बाहेर खेळायला सोडता येत नाही. येथे वाहतूक पोलीस असणे आवश्यक आहे. परिसरात मुलांना खेळायला एक मैदान नाही, की व्यायामशाळा नाही. एवढेच काय एखादा कार्यक्रम करायला हॉलदेखील येथे उपलब्ध नाही. वारंवार मागणी करूनही याकडे लक्ष दिले गेले नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
भागात अस्वच्छतेचा असून गटारी नियमित साफ होत नाहीत. कचरा उठाव वेळेवर होत नसल्याने डासांचा प्रार्दुभाव आहे. या अस्वच्छतेमुळे येथे आजारी पडण्याचेही प्रमाण जास्त आहे. परिसरात एकही सार्वजनिक स्वच्छतागृह नाही, पूर्वी होते ते स्वच्छतागृह महापालिकेने बीओटी तत्त्वावर दिले आहे. त्यामुळे कष्टकऱ्यांना रोज पैसे देऊन स्वच्छतागृहाचा वापर करावा लागतो
परिसरात अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. काहीवेळा पाईपलाईन फुटल्याने दूषित पाणीही वापरावे लागते. भागात अंतर्गत रस्ते झाले असले, तरी बसस्टॉपजवळचा रस्ता बऱ्याच वर्षांपासून रखडलेला आहे. शिवाय चौकातील लाईटचे दिवे बदलले जात नाहीत. या दिव्यांचे टेंडर स्थानिक नगरसेवकांनीच घेतले आहे. नगरसेवक फक्त आश्वासने देतात काम काहीच करत नाहीत, स्थायी समिती सभापती असताना मंजूर झालेले दोन कोटी रुपये कुठे आहेत, अशीही विचारणाही एका नागरिकाने यावेळी केली.
पार्किंगची समस्या--वीज दिव्यांची सोय नाही--पोलीस तैनात करावा--कामगारांवर लक्ष द्यावे--नियोजन नाही
व्यायामशाळा नाही--स्वच्छतागृहे अपुरी--अस्वच्छ स्वच्छतागृह