ST Strike: कोल्हापूर जिल्ह्यातील एसटी वाहतूक व्यवस्था कोलमडली, प्रवाशांचे हाल
By सचिन यादव | Updated: September 3, 2024 19:39 IST2024-09-03T19:39:14+5:302024-09-03T19:39:53+5:30
कोल्हापूर : विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा फटका एसटीच्या कोल्हापूर विभागाला बसला. मध्यवर्ती बसस्थानक, संभाजीनगर, रंकाळा बसस्थानकासह बारा ...

ST Strike: कोल्हापूर जिल्ह्यातील एसटी वाहतूक व्यवस्था कोलमडली, प्रवाशांचे हाल
कोल्हापूर : विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा फटका एसटीच्या कोल्हापूर विभागाला बसला. मध्यवर्ती बसस्थानक, संभाजीनगर, रंकाळा बसस्थानकासह बारा आगारातील वाहतूक व्यवस्था कोलमडली. दुपारी बारा वाजेपर्यंत प्रवासी वाहतूक सुरळीत होती. मात्र दुपारनंतर एसटी कर्मचाऱ्यांनी संपात उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने मध्यवर्ती बसस्थानकासह जिल्ह्यातील प्रवासी वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली.
एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच वेतन द्या, प्रलंबित महागाई भत्ता फरक द्यावा, वार्षिक वेतनवाढीचा फरक द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी संघटनांनी संप पुकारले आहे. त्याला कोल्हापूर जिल्ह्यातील एसटी कर्मचारी संयुक्त कृती समितीने पाठिंबा दिला.
दुपारी बारानंतर कर्मचाऱ्यांनी या संपात उत्स्फूर्तपणे सहभाग घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे दुपारनंतर मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली. प्रवाशांची गर्दी अधिक आणि एसटीची संख्या कमी असे चित्र सायंकाळी उशिरापर्यंत कायम राहिले. प्रवासी वर्ग खासगी आराम बस वाहतुकीकडे वळला. त्याचा आर्थिक फटकाही प्रवाशांना सहन करावा लागला.
मुंबईला जाण्यासाठी दुपारी एक वाजल्यापासून प्लॅटफॉर्मवर थांबून होतो. मात्र चार वाजेपर्यंत एकही एसटी आली नाही. त्यामुळे अन्य वाहनाने प्रवास करावा लागला. - रमाकांत देसाई, प्रवासी
दिवसभरात २० हजार किलोमीटरचा प्रवास थांबला. विविध मार्गांवरील ४०० फेऱ्या रद्द करण्यात आल्या. रात्री उशिरापर्यंत ही स्थिती कायम होती. उद्यापासून वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता आहे. - संतोष बोगरे, विभागीय वाहतूक अधिकारी