कोल्हापूर-गगनबावडा मार्गावरील बालिंगा पुलावरून वाहतूक बंद, नागरिकांमधून संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 04:06 PM2024-07-25T16:06:47+5:302024-07-25T16:07:39+5:30
पुलाजवळ मागील वर्षी पेक्षा पाणी पातळीत वाढ
प्रकाश पाटील
कोपार्डे : कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील बालिंगा पुलाच्या मच्छिंद्रीपेक्षा दीड ते दोन फुटाने पाणीपातळी वाढली आहे. यामुळे पुलाच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव वाहतूक बंद करण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रक राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता आर. बी. शिंदे यांनी प्रसिद्ध केले आहे.
गेली आठ दिवस जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे करवीर तालुक्यातील चारही नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. बालिंगा पुलाजवळ पाणी पातळी मच्छिंद्री पेक्षाही दीड फुटाने वाढली आहे. कोल्हापूर गगनबावडा मार्गावर बालिंगा येथे १३८ वर्षाचा ब्रिटिश कालीन दगडी बांधकामाचा पूल आहे. मच्छिंद्री होताच मागील वर्षी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुलाच्या सुरक्षेच्या कारणास्तव पुलावरून होणारी सर्व वाहतूक बंद केली होती.
यावर्षी बालिंगा पुलाची मच्छिंद्री होऊन दोन दिवस झाले आहे. सध्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने बालिंगा पुलाजवळ दोन्ही बाजूला सायंकाळपर्यंत रस्त्यावर पाणी येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागदेवाडी व साबळेवाडी फाटा या ठिकाणी बॅरॅकेट्स लावून वाहतूक बंद करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे.
लोकांचा संताप
नागदेवाडी येथे उभा करण्यात आलेली बॅरॅकेट्स ये जा करणाऱ्या प्रवाशांनी रस्त्याच्या बाहेर फेकून आपला संताप व्यक्त केला आहे.
पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्याने वाहतूक सुरू ठेवून पुलाच्या सुरक्षेची जबाबदारी झटकता येणार नाही. राधानगरी चे दरवाजे सुटल्याने आणखी दीडदोन फुट पाणी पातळी वाढली आहे. सायंकाळ पर्यंत रस्त्यावर पाणी येणार आहे. तरीही सायंकाळ नंतर वाहतूक बंद करणार आहे - आर.बी. शिंदे (उपअभियंता राष्ट्रीय महामार्ग)