‘गडहिंग्लज’ला वाहतुकीचा आराखडा

By admin | Published: October 6, 2015 11:18 PM2015-10-06T23:18:17+5:302015-10-06T23:18:17+5:30

नागरिकांच्या सूचना : सुरक्षित वाहतुकीवर दोन तास चर्चा, पालिका करणार नियोजन

Traffic plan for 'Gadhinglj' | ‘गडहिंग्लज’ला वाहतुकीचा आराखडा

‘गडहिंग्लज’ला वाहतुकीचा आराखडा

Next

गडहिंग्लज : गडहिंग्लज शहरातील वाहतुकीची कोंडी आणि वाढते अपघाताचे प्रमाण लक्षात घेऊन नागरी सुरक्षिततेसाठी वाहतुकीचा सर्वंकष आराखडा तयार करण्याचा निर्णय शहरातील मान्यवर व नागरिकांच्या बैठकीत झाला. सूचनांच्या स्थानिक पातळीवरील कार्यवाहीची जबाबदारी नगरपालिका व पोलिसांनी घेतली.गेल्या पंधरा दिवसांत शहरात झालेल्या दोन अपघातात दोन निष्पाप महिलांचा मृत्यू झाला. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी ‘सुरक्षित वाहतुकीच्या उपाययोजने’वर विचारविनिमयासाठी ही बैठक झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष राजेश बोरगावे होते. पालिकेच्या शाहू सभागृहात ही बैठक झाली.
नगर अभियंता रमेश पाटील, पोलीस कर्मचारी दत्ता शिंदे, भाजप शहराध्यक्ष आनंद पेडणेकर, ‘दानिविप’चे रमजान अत्तार, भारतीय किसान संघाचे राम पाटील, हॉटेल असोसिएशनचे रोहन हंजी, कॉ. आय. सी. पाटील, रमेश शिंदे, अजित चोथे, सिद्धार्थ बन्ने यांनीही सूचना मांडल्या. आठवडा बाजाराच्या दिवशी बॅ. नाथ पै विद्यालय, म. दु. श्रेष्ठी विद्यालय व लक्ष्मी मंदिर आवार याठिकाणी पे अँड पार्किंगची व्यवस्था करावी, अशी सूचना करण्यात आली. नागरिकांच्या सूचनांची नोंद घेऊन वाहतुकीचा सर्वंकष आराखडा तयार करून शासनाच्या मंजुरीने त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही नगराध्यक्ष बोरगावेंनी दिली.
आगारप्रमुख सुनील जाधव, आर्किटेक्ट अँड इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष शैलेंद्र कावणेकर, उपाध्यक्ष विरुपाक्ष पाटणे, जि. प.चे सदस्य शिवप्रसाद तेली, लायन्स क्लबचे अध्यक्ष रमेश वांद्रे, सह्याद्री अ‍ॅडव्हेंचर्सचे अनिल मगर, कृष्णात पर्यावरण संस्थेचे अनंत पाटील, शहर किराणा भुसार असोसिएशनचे अध्यक्ष शिवानंद रिंगणे, बेकरी असोसिएशनचे अध्यक्ष दीपक कोळकी, सुनील गुरव, जिजाऊ ब्रिगेडच्या अलका भोईटे, रेखा पोतदार, सुनील गुरव उपस्थित होते. स्वागत व सूत्रसंचालन श्रीनिवास वेर्णेकर यांनी केले. नगरसेविका अरुणा शिंदे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

‘रोटरी’ने दाखवली बांधीलकी
सुरक्षित वाहतुकीसाठी धोक्याच्या ठिकाणी रेडियम रेफ्लेक्टर, नो-पार्किंग, पार्किंग, वेगमर्यादा आदी सूचना फलक ‘रोटरी’ क्लबतर्फे बसवून देण्यात येतील, अशी ग्वाही ‘रोटरी’चे अध्यक्ष बाळासाहेब गुरव यांनी दिली.


कोण काय म्हणाले ?
गटनेत्या प्रा. स्वाती कोरी : रिंगरोडचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते व पालिकेचे पदाधिकारी व अधिकारी आणि संबंधित शेतकऱ्यांची तातडीने बैठक घेऊन वळण रस्त्यांच्या भू-संपादनाचा प्रश्न सामोपचाराने मिटवावा.
विरोधी पक्षनेते रामदास कुराडे : शहरातील अधिकृत बसथांब्यावरच बसेस थांबवाव्यात. वाहतुकीची कोंडी होणाऱ्या बसवेश्वर चौकातील बसथांबा अन्यत्र हलवावा.
मुख्याधिकारी तानाजी नरळे : पार्किंग-नो पार्किंग आणि एकेरी वाहतुकीबाबत तातडीने प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठविला जाईल.
पोलीस उपनिरीक्षक प्रियंका शेळके : ट्रॅव्हल बसेसचा थांबा तातडीने बदलला जाईल.
डॉ. बी. एस. पाटील : वाहतुकीच्या विकेंद्रीकरणासाठी शहराच्या पश्चिम भागात दुसरे बसस्थानक व्हावे. अपघातातील जखमींवर उपचारासाठी गडहिंग्लजमध्ये अत्याधुनिक शासकीय ट्रामा सेंटरची गरज आहे.
रवींद्र बेळगुद्री : शहरातून होणाऱ्या ऊस वाहतुकीची वेळ निश्चित करावी.
महालक्ष्मी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तारळे : शहरात अधिकृत वाहनतळांची व्यवस्था करावी.
माजी प्राचार्य सदानंद वाली : विनापरवाना वाहने चालविणाऱ्या अल्पवयीन मुलांवर कारवाई करण्याबरोबरच त्यांच्या पालकांनाही समज द्यावी.
नगरसेवक बसवराज खणगावे : चेहऱ्यावर स्कार्प बांधून वाहने चालविणाऱ्यांवर कारवाई करावी.


तातडीने सुरू झाली कार्यवाही
ट्रॅव्हल बसेसना नगरपालिकेसमोर थांबण्यास प्रतिबंध.
मेन रोडवरील दुतर्फा दुकानांसमोरील विषम तारखांच्या पार्किंगची अंमलबजावणी.
भरधाव धावणाऱ्या वाहनांवर शहरात वेगमर्यादा.
लायसेन्सशिवाय वाहने चालविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई.
मेनरोड व बाजारपेठेतील दुकानासमोरील अतिक्रमणे हटविणार.



‘लोकमत’च्या वृत्ताची चर्चा
गडहिंग्लज शहरातील नागरी सुरक्षिततेचा प्रश्न आणि वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी व सुरक्षित वाहतुकीसाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनासंदर्भात ‘लोकमत’ने मंगळवारच्या अंकात ‘गडहिंग्लज’मध्ये नागरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ! या मथळ्याखाली विशेष वृत्त प्रसिद्ध केले होते. या सडेतोड बातमीची शहरात चर्चा झाली. ‘लोकमत’ने सुचविलेल्या सूचना काही नागरिकांनी बैठकीत जोरदारपणे मांडल्या.

Web Title: Traffic plan for 'Gadhinglj'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.