वाहतूक पोलिसांकडूनच नियमांची पायमल्ली
By Admin | Published: March 17, 2015 11:33 PM2015-03-17T23:33:22+5:302015-03-18T00:03:31+5:30
‘मार्च एंडिंग’ : वाहनधारकांची पिळवणूक
कोल्हापूर : नंबर व्यवस्थित अन् ठळक हवेत, जेणेकरून ते पटकन वाचता येतील, आदी नियम आहेत; पण या नियमांची नेहमी पायमल्ली होते. याकडे शहर वाहतूक शाखेचे लक्ष कसे नाही, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडत आहे. परंतु, वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या नागरिकांना वाहतूक पोलीस सन्मानाची वागणूक न देता ‘ए, चल गाडी बाजूला घे’, अशी अरेरावीची भाषा वापरत आहेत. कायद्याचे रक्षण करणारेच रस्त्यावर गुंडगिरी करू लागल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शहरात सध्या दुचाकींचा वापर करून घडत असलेल्या गुन्ह्यांमध्ये चोऱ्या, चेन स्नॅचिंग, अपहरण व अपघातांसारख्या घटनांचा समावेश असून, अशा गुन्ह्यांमध्ये वापरलेल्या वाहनांना नोंदणी क्रमांक नसल्याने तपासात अडचणी निर्माण होत आहेत. काही वाहनचालक वाहनांवर नंबर न घालता दादा, मामा, राज, राम, भाई, अमर, पाटील, राऊत असे फॅन्सी अक्षरातील नंबर लावतात. अशा वाहनांवर गेल्या वर्षभरापासून वाहतूक शाखेच्यावतीने कारवाई सुरू आहे. मार्च एंडिंगचा कोटा पूर्ण करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून ‘दबंग’गिरी सुरू केली आहे. नियम पाळणाऱ्या वाहनधारकांकडेही गाडीच्या कागदपत्रांची मागणी करून सक्तीने दंडाची रक्कम वसूल केली जात आहे. बिंदू चौक, भवानी मंडप परिसरात बंदोबस्तास असणाऱ्या वाहतूक पोलिसांनी तर कहरच केला आहे. बाहेरून आलेल्या पर्यटक, भाविकांना या पोलिसांकडून अरेरावीची भाषा ऐकावी लागत आहे. चार-पाचजणांची टीम बनवून चौका-चौकांत वाहनांची तपासणी करण्याची मोहीम सध्या सुरू केली आहे. या टीमचा रुबाब आणि उद्धट भाषा यामुळे खाकी वर्दीतल्या गुंडगिरीचे दर्शन लोकांना पाहायला मिळत आहे. वाहनचालक परवाना असूनही गाडीची कागदपत्रके जवळ नाहीत, असे कारण सांगत सक्तीने दंडाची वसुली केली जात आहे, या वाहतूक पोलिसांबाबतीत नागरिकांतून तक्रारी वाढल्या आहेत. (प्रतिनिधी)
नागरिकांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी पोलिसांनी घेतली पाहिजे. शहर वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना याप्रकरणी सक्त सूचना देऊ.
- अंकित गोयल,
अप्पर पोलीस अधीक्षक